औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ आहे, या चळवळीत लाखोचा मराठा समाज सहभागी आहे, असे असताना काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले. ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी लढवावी, मात्र राजकीय पक्ष काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नाव वापरण्यास आमचा विरोध असल्याचे समन्वयक सुरेश वाकडे , किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
किशोर चव्हाण म्हणाले की, मराठा समाजातील कोपर्डी येथील मुलींवर अत्याचार करून खून झाल्याची घटना घडल्यांनतर पहिला मूक मोर्चा औरंगाबादेत ९ ऑगस्ट २०१६ रोजी निघाला. पीडितेला न्याय द्यावा, या मागणीसह मराठा आरक्षण आणि शेतीमालाला हमी भाव आदी मागण्या या मोर्चाने लावून धरल्या होत्या. यापैकी अनेक मागण्या मार्गी लागल्या आहे. राज्यभर ५८ मूकमोर्च निघाले होते. मोर्च्यामुळे सरकारला मराठा समाजाची ताकद आणि शिस्तीचे दर्शन झाले.
मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ असून मराठा समाजातील सर्व सामान्यांची अस्मिता आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वस्तरातील लोकांनी निस्वार्थ भावनेने एकत्र येऊन उभी केलेली चळवळ आहे. या चळवळीचा वापर काही जण राजकीय स्वार्थासाठी करीत आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढविणार असल्याचे काही लोकांनी मुंबईत जाहिर केले. राजकीय पक्ष काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा वापर करण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला रमेश गायकवाड, मनोज गायके, सतीश वेताळ, आत्माराम शिंदे, नितीन कदम, शिवाजी जगताप, विक्की पाटील, अमोल सोळुंके आदींची उपस्थिती होती.