अपघातातील मृताच्या वारसांना ३२ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 05:04 PM2019-02-20T17:04:24+5:302019-02-20T17:05:08+5:30
वाहन मालक, चालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई देण्याचे आदेश
औरंगाबाद : दगडाला मोटार धडकून झालेल्या अपघातात मरण पावलेले नंदकुमार सयाजी तारू (रा. गंगापूर) यांच्या वारसांना ३२ लाख २० हजार रुपये ८ टक्के व्याजासह नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य एच. के. भालेराव यांनी प्रतिवादींना दिला. प्रतिवादी वाहन मालक, चालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
१२ डिसेंबर २०१४ रोजी नंदकुमार तारू हे मित्रांसोबत कारने (एम.एच. २० सीएच ६२६२) कायगावमार्गे गंगापूरला जात असताना भेंडाळा फाटा येथे चालकाने निष्काळजीपणे कार चालवत रस्त्यावरील दगडाला धडक दिली. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यात तारू व चालक गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तारू यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंगापूर ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तारू यांचे वारस पत्नी, मुले व आई यांनी अॅड. रामकिसन पुंगळे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिकरणाचे सदस्य एच. के. भालेराव यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला.