औरंगाबाद : माहिती पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहक कल्याण निधीत १५ हजार रुपये ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.ग्राहकास झालेल्या मानसिक त्रासापोटी ७५०० रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी २५०० रुपये व ३० दिवसांत डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट बसवून देण्याचे आदेश मंचाच्या अध्यक्षा स्मीता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले व संध्या बारलिंगे यांनी दिले आहेत. इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहकास सोलर यंत्रणा बसविण्यासाठी अनुदान व सोलार यंत्रणेतील डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट बसवून देण्यासाठी माहिती पुस्तकात स्पष्ट केले होते.सचिन सुभाषराव जाधव (रा. उत्कर्षनगर, सिडको एन ११) यांनी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीची सोलार व्यवस्था घेण्यासाठी सूतगिरणी चौकातील दीपक लड्डा यांच्याकडे माहिती घेतली. कंपनीच्या वतीने ४ के.डब्ल्यू. क्षमतेची सोलार रूफ टॉप आॅन ग्रीड ही यंत्रणा २ लाख ९० हजार रुपयांमध्ये बसविण्याचे निश्चित करण्यात आले. सोलार यंत्रणेत ८१ हजार रुपयांचे अनुदान ग्राहकास देण्याची तरतूद असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. जाधव यांनी ३ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांच्या घरी सोलार यंत्रणा कार्यान्वित केली. त्यासाठी आरटीजीएसद्वारे २ लाख ९० हजार रुपये जमा केले. अर्जदारास अनुदानापोटी कंपनी ८१ हजार परत करील आणि डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट कार्यान्वित होईल, असे त्यांना वाटले; परंतु माहिती पुस्तिकेतील उल्लेखाप्रमाणे काहीच मिळत नसल्याने जाधवांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला; परंतु कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली. तेव्हा कंपनीने अनुदानाशी आमचा संबंध नसल्याचे सांगून हात वर केले. तसेच ग्राहकाकडे ब्रॉडबँड, इंटरनेट व वायफाय नसल्याने इक्विपमेंट बसवून देता येत नसल्याचेही सांगितले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सेवेत उणीव ठेवल्याप्रकरणी ग्राहक मंचाने उपरोक्त आदेश दिले. ग्राहकातर्फे अॅड. राहुल जोशी तर गैरअर्जदार कंपनीच्या वतीने अॅड. एस. आर. मालानी यांनी काम पाहिले.
ग्राहक कल्याण निधीत १५ हजार रुपये ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:25 PM
माहिती पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहक कल्याण निधीत १५ हजार रुपये ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.
ठळक मुद्दे माहिती पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याचे प्रकरण