उस्मानाबाद उपकेंद्राचे रुपांतर स्वतंत्र विद्यापीठात ? अभ्यासगट तीन महिन्यात देणार अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:51 PM2020-08-21T15:51:38+5:302020-08-21T15:54:49+5:30
१६ आॅगस्ट २००४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात आले.
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का, यासाठी सात सदस्यांचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी एका बैठकीत दिली. हा अभ्यासगट तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करील.
औरंगाबाद शहरापासून खूप अंतर असल्यामुळे उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी १९९४ पासून मागणी करण्यात येत आहे. या मागणीमुळेच १६ आॅगस्ट २००४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात आले. या उपकेंद्राचा मागील दहा वर्षांत कायापालट करण्यात आला होता. उपकेंद्राचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हा केवळ सहा विभाग अस्तित्वात होते. सद्य:स्थितीत उपकेंद्रात दहा विभाग असून, ६० एकर जमीन उद्योग विभागाकडून विकत घेण्यात आली आहे. सहा कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारत उभारली आहे. वसतिगृहे, विभागांसाठीही इमारती उभारण्यात आल्या आहेत. उपकेंद्र परिसरात पाच हजार वृक्षांची लागवडही करण्यात आलेली आहे.
याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यात ६४ महाविद्यालयांत ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी १६ आॅगस्ट २०१४ रोजी प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव मांडला. त्यास सदस्य संजय निंबाळकर यांनी अनुमोदन दिले. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच मार्च २०१५ मध्ये झालेल्या विदयापीठ अधिसभेच्या बैठकीत संजय निंबाळकर यांनी ठराव मांडला व नितीन बागूल आणि प्रा. संभाजी भोसले यांनी अनुमोदन दिले. अधिसभेतही ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. उपकेंद्रात नुकतीच कोविड-१९ विषाणू तपासणी प्रयोगशाळा व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्यामुळे राजकीय विरोधक असलेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उस्मानाबादचे खा. ओमप्रकाश निंबाळकर, आ. कैलास पाटील, उच्च शिक्षण विभागाचे सचिव, संचालक डॉ. धनराज माने, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसिचव डॉ. जयश्री सूर्यवंशी, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
समितीमध्ये कोण असणार?
उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू आर.एन. माळी यांची तर, सदस्य म्हणून डॉ. डी.टी. शिर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अनार साळुंखे, एम. डी. देशमुख, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी असणार आहेत. ही समिती तीन महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करेल, अशा सूचनाही मंत्र्यांनी दिल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.