...अन्यथा लागवडीचे क्षेत्र पडीक दाखविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:04 AM2021-09-13T04:04:34+5:302021-09-13T04:04:34+5:30
सोयगाव : शासनाच्या निर्देशानुसार शेताची ई-पीक पाहणी न केल्यास थेट पेरणी केलेले शेती पडीक दाखविण्यात येऊन संबंधित क्षेत्रावर पेरणी ...
सोयगाव : शासनाच्या निर्देशानुसार शेताची ई-पीक पाहणी न केल्यास थेट पेरणी केलेले शेती पडीक दाखविण्यात येऊन संबंधित क्षेत्रावर पेरणी न झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश ई-पीक पाहणी प्रकल्प संचालक पुणे यांनी महसूल विभागाला दिले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात ॲप्सद्वारे ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात ‘माझा पेरा मीच नोंदविणार’ या उपक्रमाची मुदत १५ सप्टेंबरवरून ३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या अनुषंगाने पीक पाहणी प्रकल्पास मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु तरीही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी न केल्यास क्षेत्र पडीक दाखवून पुढील हंगामात कोणत्याही बँकेकडून पीक कर्ज मिळणार नाही. यासह पीकविमा योजनेच्या लाभापासूनही शेतकरी मुकणार असल्याचे स्पष्ट निर्देश पुण्यावरून काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, शासनाने एखाद्या पिकाला नुकसानीची मदत जाहीर केल्यास, पीक पाहणी झालेली नसल्यास मदतही शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. वन्य प्राण्यांकडून नुकसान झालेले असल्यास आणि त्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पीक पाहणीची नोंदणी नसल्यास ते मदतीस पात्र ठरणार नाही, महसूल विभागाला प्राप्त झालेल्या आदेशात नमूद आहे.
--------
ई-पीक पाहणी प्रकल्पासाठी शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी निर्देशाप्रमाणे ई-पीक पाहणी करून घ्यावी, यासाठी संबंधित तलाठी, कृषी सहायक शेतकऱ्यांच्या दिमतीला देण्यात आले आहे. अडचणी आल्यास तातडीने संबंधित तलाठ्याला संपर्क साधवा, असे आवाहन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले आहे.