औरंगाबाद : मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्तालयात जाऊन आयुक्तांना भेटायचे, त्यांना बोलवा, असे म्हणून गोंधळ घालणाऱ्या दोन दारुड्यांना पकडून पोलिसांनी त्यांची मद्य तपासणी करीत पुढील कारवाई केली.
पवन लक्ष्मणराव वैष्णव (रा. कुंभार पिंपळगाव, जि. जालना) आणि प्रफुल्ल अशोक मोटे (२३, रा. जे सेक्टर, मुकुंदवाडी) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी (दि.१० मे) रात्री दीड वाजेच्या सुमारास पवन आणि प्रफुल्ल पोलीस आयुक्तालयात गेले. तेथे पोलीस गार्ड आणि नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी बसलेले होते. आत प्रवेश करताच त्यांना पोलिसांनी रोखले. आम्हाला पोलीस आयुक्तांना भेटायला आल्याचे त्यांचे म्हणणे होते. आमची तक्रार आम्ही त्यांनाच सांगणार असाही त्यांचा आग्रह होता. पोलीस आयुक्त सकाळी भेटतील, तुम्ही उद्या या, असे पोलिसांनी त्यांना सांगितले; पण नशेत झिंगणाऱ्या दोघांनी आरडाओरड करून गोंधळास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
शेवटी बेगमपुरा ठाण्यातील गस्तीवरील पोलिसांना बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. ते वाहनातही बसण्यास नकार देत होते. शेवटी बळजबरीने त्यांना पोलीस वाहनाने बेगमपुरा ठाण्यात आणि नंतर घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ते मद्य प्राशन केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. याआधारे हवालदार विलास थोरात यांनी सरकारतर्फे पवन आणि प्रफुल्ल विरुद्ध बेगमपुरा ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला.