औट्रम घाटातून जड वाहतूकीस बंदीनंतर पर्यायी रस्ताही खराब; आता 'या' मार्गे वाहतूक वळणार
By विकास राऊत | Published: February 12, 2024 01:36 PM2024-02-12T13:36:02+5:302024-02-12T13:39:48+5:30
प्रशासनाच्या बैठकीत निर्णय;पर्यायी रस्ता दुरुस्तीसाठी तीन महिन्यांचा वेळ लागणार आहे
छत्रपती संभाजीनगर : औट्रम घाटाचा पर्यायी रस्ताही खराब झाल्याने तो तातडीने दुरुस्त करण्यात येणार आहे. रस्तादुरुस्तीसाठी नांदगाव - मालेगाव - येवला - वैजापूर या मार्गावरून जड वाहतूक वळविण्यात येणार आहे. याचे लवकरच आदेश निघतील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
नांदगावमार्गे वाहने वैजापूरला आल्यानंतर ती लासूरमार्गे छत्रपती संभाजीनगर किंवा समृद्धी महामार्गमार्गे छत्रपती संभाजीनगर; अशी येऊ शकतील. नांदगाव-शिऊर बंगला हा मार्ग दुरुस्त करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यापूर्वीच हा मार्ग दुरुस्त करण्याचा प्रयत्न विभागाकडून गेला जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभाग सूत्रांनी सांगितले.
रस्तादुरुस्तीसाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. धुळे-सोलापूर मार्गावरील औट्रम घाटातील रस्ता खराब झाल्याने अपघात वाढत आहेत. ऑगस्ट २०२३ पासून औट्रम घाटातून जड वाहतूक पूर्णत: बंद केल्यानंतर त्या मार्गावरील जड वाहतूक नांदगाव- शिऊर बंगला या मार्गावरून वळविली. जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने तो रस्ता खराब झाला. तलवाडा घाट अरुंद असल्याने आणि अनेक वळणे असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात या रस्त्याच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी बैठक घेऊन रस्तादुरुस्तीचे आदेश दिले.