लोकमत न्यूज नेटवर्कपोत्रा : गेल्या सतरा वर्षापासून न्याय प्रविष्ट असलेला वाद आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी दोन्हीही गटांना बोलावून मध्यस्थी करीत ९ गावांतील शेकडो प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत मिटवून वादाला पूर्णविराम दिला आहे.पोत्रा येथील माहेरवासीन असलेली राधाबाई रुद्राजी बेनगर रा. सापतळी ता. कळमनुरी हिने आपला पती वारल्यानंतर १९८१ ला सापळी येथील गणेश रुद्राजी उर्फ शिवशंकर रामचंद्र बेनगर (४६) या एकुलत्या एक मुलास दत्तक घेतले होते. त्यास आपला संपूर्ण शेतीसहित स्थावर मालमत्ता नावे करून दिली होती. कालांतराने त्या दोघामध्ये किरकोळ भांडण होऊन गणेश बेनगर हा त्यांच्या वडिलाकडे राहायला गेला तर राधाबाई ही आपल्या माहेरी पोत्रा ता. कळमनुरी या गावी राहायला गेली.तब्बल १९ वर्षे राधाबाई हिने आपल्या दत्तक पुत्रास जगविले, वाद विकोपाला गेल्यानंतर संपूर्ण मालमत्ता परत मिळवून दत्तक रद्द करण्यासाठी कळमनुरी येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने २००२ साली एकुलता एक पुत्र असल्याने दत्तक रद्द केले. त्यानंतर हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण अपील झाले. २००७ ला पुन्हा न्यायालयाने तोच दत्तक रद्दचा फैसला दिला. पुन्हा गणेश बेनगर यांनी औरंगाबाद येथील खंडपीठात प्रकरण अपील केले. गणेश बेनगर याच्या नावे दत्तक आधार केलेली १९ एकर जमीन होती. दत्तक रद्द करून सदर जमिनीवर स्थगिती आणून ताबा मिळविण्यासाठी राधाबाई यांनी यश प्राप्त केले होते. २८ डिसेंबर २०१६ ला राधाबाई हिचे पोत्रा येथे त्यांचे भाचे विठ्ठलराव बळीराम मुलगीर यांच्या राहत्या घरी निधन झाले. निधनानंतर अत्यंसंस्कार, पाणी पाजवण्यासह इतर विधी विठ्ठल मुलगीर यांनी केल्या. निधनापूर्वीच २०११ ला राधाबाई हिने दुय्यम निबंधकाकडे कायदेशीर मृत्यूपत्र करून संपूर्ण स्थावर मालमत्ता, शेती ही आपले भाचे विठ्ठल बळीराम मुलगीर यांच्या नावे करून दिली होती. वाद वाढतच राहिला. विठ्ठल मुलगीर याने त्या जमिनीवर मनाई हुकूम आणून आखाडा बाळापूर पोलीस ठाणे गाठले.आखाडा बाळापूरचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दोन्हीही पार्ट्यांना बोलावून संभाव्य काळातील धोक्याच्या घंटेबद्दल माहिती देऊन समजावून सांगून तुम्ही तुमचे नातलग समाजबांधव बोलावून आपसात मिटवून घ्या म्हणून कायदेशीर मार्गदर्शन केले.त्या अनुषंगाने दोन्ही गटांनी आखाडा बाळापूर येथे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील नेवरवाडी, बारडवाडी, डोंगरगाव, शेळगाव (महाविष्णू), वंदन, ईरलद, आडगाव, येहळेगाव गवळी, पोत्रा, सापळी येथील प्रतिष्ठीत नामदेव बेनगर, लालजी कलगोंडे, पंडित मिजगर, रामराव मिजगर, प्रकाश मुलगीर, दिगंबर निळे, किशोर मुलगीर, उमाकांत मुलगीर, विजय मुलगीर, गणपत सुकापुरे, शेळगावचे देवीदास मुलगीर, मुकुंद निळे, रघुनाथ पाटील, बालासाहेब व्हरगळ, श्रीकांत मुलगीर, दशरथ मिजगर, उद्धव भोसले, वसंत मुलगीर यांच्यासह शेकडो प्रतिष्ठीत उपस्थित होते.अखेर विठ्ठल मुलगीर यांनी मनाचे मोठेपण आणि औदार्य दाखवून दत्तक पुत्रास चौदा एकर व स्वत: पाच एकर जमीन घेऊन १७ वर्षांच्या वादाला पूर्णविराम दिला.त्यानंतर उपस्थितांच्या वतीने पोलीस निरीक्षकांचा सत्कार करून पेढे वाटले.
१७ वर्षांपासूनचा शेतीचा वाद मिटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:34 AM