छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना जेवणाचे डब्बे आणि चारचाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याने त्या संस्थेशी संबंधित लोकांनी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील टोल नाका बंद पाडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी १२ वाजता घडली. यामुळे महामार्गावर मोठ्याप्रमाणावर वाहनांचा खोळंबा झाला होता. मात्र, यावर टोलनाका व्यवस्थापक काहीही माहिती देत नसल्याने वाहनधारक संतप्त झाले.
वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील टोल नाक्यावर कामाला असलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना काही संस्थेकडून जेवणाचा डब्बा पुरवला जातो. सोबतच येण्याजाण्यासाठी चारचाकी वाहने देखील कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. मात्र या दोन्ही संस्थांचे बिल मागील काही दिवसांपासून थकीत आहे, अनकेदा मागणी करून देखील बिल मिळत नव्हते. यामुळे दोन्ही संस्थेंच्या संबंधित लोकांनी आज दुपारी टोलनाक्यासमोर गाड्या आडव्या लावून थेट समृद्धी महामार्गच बंद पाडला. यामुळे वाहनांची मोठी रांग येथे लागली. वेळे वाचण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारक संतप्त झाले. वाहतूक खोळंबा का झाला असा जाब वाहनधारकाने विचारातच टोलनाका व्यवस्थापकास उत्तर देऊ शकला नाही. यामुळे समृद्धी महामार्गावर प्रशासकीय कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले. तब्बल चार तास हा गोंधळ सुरु असल्याची माहिती आहे. मुख्य व्यवस्थापकाने धाव घेऊन थकीत बिल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आडवी लावलेली वाहने बाजूला काढण्यात आली, त्यानंतर वाहतूक सुरु झाली.
संतप्त वाहन चालकांनी गेट तोडलेदरम्यान, दोन तास पेक्षा अधिक थांबल्यावर देखील रस्ता सुरु होत नसल्याने वाहनधारकांमध्ये संताप पाहायला मिळाला. तर एका ट्रक चालकाने पुढे जाण्याची विनंती केली मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ट्रकचालकाने थेट टोलनाक्याचे गेट तोडले. त्याच्यामागे अनेक गाड्या पुढे निघून गेल्या.