मालकीहक्कच असुरक्षित...!
By Admin | Published: December 20, 2015 11:28 PM2015-12-20T23:28:51+5:302015-12-20T23:53:15+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड जागेच्या मालकी बाबतच्या प्रकरणांमध्ये मोठे वाद आहेत. भूमीअभिलेख कार्यालयात याबाबत नागरीकांचे आक्षेप अर्ज असताना देखील जागेंचे फेरफार होतात.
व्यंकटेश वैष्णव , बीड
जागेच्या मालकी बाबतच्या प्रकरणांमध्ये मोठे वाद आहेत. भूमीअभिलेख कार्यालयात याबाबत नागरीकांचे आक्षेप अर्ज असताना देखील जागेंचे फेरफार होतात. जमीनींचे मालकी हक्कच असुरक्षीत आहेत. धनदांडग्यांना जमिनी बळकवून देण्यासाठी मदत करणारी टोळीच भूमीअभिलेख कार्यालयात सक्रीय आहे. याचे पुरावे ‘लोकमत’कडे उपलब्ध आहेत.
येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे. खासरा पत्रक नसताना सातबारा बनवून जमीनींचे व्यवहार झाल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. आता तर क्षेत्र शिल्लक नसताना देखील फेरफार ओढल्याने जागेचे मूळ मालक हादरले आहे. ही परिस्थिती केवळ बीड शहरापुरतीच मर्यादित नाही तर जिल्हयातील जमीनींचे मालकी हक्क धोक्यात आले आहेत. बीड येथील ललीत अब्बड व इतरांनी सिटी सर्व्हे नंबर ४५९९ या जागेवर क्षेत्र शिल्लक नसताना देखील दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावे फेर करून दिल्याबाबत लेखी आक्षेप घेतला. असे असताना देखील भूमी अभिलेख कार्यालयाने दुसऱ्या एका व्यक्तीचे नावाने फेर ओढला. अब्बड यांनी २ डिसेंबर २०१४ दरम्यान आक्षेप अर्ज केला होता. या अर्जाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत सदरील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ३० जुलै २०१५ रोजी फेरफार करून दिला. आक्षेप अर्जानंतर १७ महिन्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाने आक्षेप अर्ज निकाली न काढता. खोटे कागदपत्र तयार करून फेरफार ओढला व १९ आॅगस्ट २०१५ रोजी मंजूर केले असल्याचे चेतन अब्बड यांनी सांगितले.
मूळ जागा मालकाचे
वारसदारच केले बेघर
भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयाच्या बोगस कारभाराच्या नवनवीन कथा समोर येत आहेत. कागदपत्रांचा खेळ करत चक्क मूळ जागा मालकाच्या वारसदारानांच बेवारस करण्याचा प्रकार केला आहे. शहरातील हिरालाल चौक, बुरूड गल्ली येथील सिटी सर्व्हे नं.४५९९ मधील ५३.१ क्षेत्रातील अर्धी जागा मालकीची असताना देखील रेकॉर्डवर ही जागा नसल्याचे दाखवून जागा मालक मन्नूलाल अब्बड यांच्या वारसदारांना बेघर केले असल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट होते.
न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव
आक्षेप अर्ज दिलेला असतानाही १७ महिन्यानंतर फेरफारला मंजुरी दिली जाते. यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. याबाबत न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा आक्षेप अर्जदार चेतन अब्बड यांनी दिला.