वाळूज महानगर : बँक फसवणूक प्रकरणात ३ महिन्यांपासून फरार असलेला आॅरबिट कंपनीचा मालक अनिल राय याला शनिवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बडोदा येथून अटक केली. रविवारी त्यास न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अनिल राय (३३, रा. सी-१४ चाणक्यपुरी, शहानूरमियाँ दर्गा रोड, औरंगाबाद) याने २०१२ मध्ये व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अदालत रोड शाखेतून साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीच्या ८०० स्क्वेअर मीटर बांधकाम असलेल्या भूखंडाची मूळ कागदपत्रे व १ कोटी ७० लाख ३३ हजार रुपये किमतीच्या १७ मशिनरी बँकेकडे तारण ठेवल्या होत्या. बँकेने अनिलकडे परतफेडीसाठी वारंवार पाठपुरावा केला. ८ एप्रिल २०१५ रोजी बँकेने तारण मालमत्ता जप्त करण्याची नोटीस पाठविली. तरीही कोणताच प्रतिसाद न दिल्यामुळे बँकेकडून २० आॅगस्ट रोजी पुन्हा कंपनीत नोटीस लावण्यात आली. अनिल राय ३ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. एमआयडीसी पोलिसांनी अनिल राय यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री गुजरातमधील बडोदा येथून अटक केली. रविवारी त्याला गंगापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास फौजदार राहुल भदरगे करीत आहेत. कंपनीतील मशिनरी गायब करून परागंदा लोकमतने १७ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून कंपनीतील मशिनरीही गायब केल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ते वाचून बँकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत पाहणी केली असता मशिनरी व साहित्य गायब केल्याचे आढळले. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक अनिलकुमार सिंग यांनी २९ सप्टेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनिल राय, व्यवस्थापक दादा घोंगडे, जामीनदार संगीता व सुनील राय यांच्या विरोधात तक्रार दिली.
आॅरबिट कंपनीचा मालक अटकेत
By admin | Published: December 20, 2015 11:41 PM