- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या १७ महिन्यांत ९ लिक्विड ऑक्सिजन टँक आणि २ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले. महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयातही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण झाले. जिल्हा रुग्णालयात मात्र अजूनही ऑक्सिजनचा खेळ सुरुच आहे. येथील लिक्विड ऑक्सिजन टँक ५ महिन्यांनंतरही रिकामाच आहे, तर उभारलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही काढून आता तो इतरत्र बसविण्यात येणार आहे. सुदैव इतकेच जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ ६ कोरोना रुग्ण दाखल आहेत.
जिल्हा रुग्णालयात १४ मार्च रोजी लिक्विड ऑक्सिजन टँकच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तब्बल चार महिने कासवगतीने या टँकचे काम चालले. या टँकच्या बाजूलाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही उभा राहिला; परंतु या रुग्णालयाला अद्यापही ना लिक्विड टँकमधून ऑक्सिजन मिळतो, ना प्रकल्पातून. त्यामुळे अद्यापही ऑक्सिजन सिलिंडरवरच जिल्हा रुग्णालयाची मदार आहे. येथे दाखल असलेल्या ६ कोरोना रुग्णांपैकी केवळ एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे.
का रेंगाळले ऑक्सिजन टँक
जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँकच्या बाजूलाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. शिवाय याच ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा उभी करण्यात आली. लिक्विड ऑक्सिजन टँकच्या आजूबाजूला काहीही नसावे, असा नियम आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही काढण्याची वेळ आली आहे; मात्र आजघडीला प्रयोगशाळेमुळे ‘पेट्रोलियम ॲण्ड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’च्या (पेसो) प्रमाणपत्र मिळण्यास अडचण असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रयोगशाळा लवकरच अन्यत्र हलविण्यात येणार आहे.
--------
दुसऱ्या प्रकल्पाचे काम सुरु
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प काढून राज्य कामगार विमा रुग्णालयात बसविण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयासाठी आता दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर झाला असून, त्याचे कामही सुरु झाले आहे. लिक्विड ऑक्सिजन टँकसाठी ‘पेसो’ प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
---------
फोटो ओळ..
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात लिक्विड ऑक्सिजन टँकच्या एका बाजूला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे, तर दुसऱ्या बाजूने ‘आरटीपीसीआर’ चाचणी प्रयोगशाळा आहे.