पैठण कारागृहातील बंदिजनांच्या हातची खमंग मिसळ चाखा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:48 AM2017-12-17T00:48:20+5:302017-12-17T00:49:42+5:30
पैठण येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या हाताला मोठी ‘गोडी’ लाभली आहे. पैठण -शेवगाव रोडवर नैसर्गिक वातावरणात कारागृहासमोर लाकडी चरक टाकून कारागृह प्रशासनाने या कैद्यांना रसवंती टाकून दिली आहे.
संजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या हाताला मोठी ‘गोडी’ लाभली आहे. पैठण -शेवगाव रोडवर नैसर्गिक वातावरणात कारागृहासमोर लाकडी चरक टाकून कारागृह प्रशासनाने या कैद्यांना रसवंती टाकून दिली आहे.
या रसवंतीसाठी लागणारा उस कारागृहाच्या शेतीतून घेतला जात असून अत्यंत ताजा व नैसर्गिक उसाचा रस मिळत असल्याने या रसवंतीवर ग्राहकांची संख्या वाढली आहे.
क्षणिक रागाच्या भरात हातून गुन्हा घडलेले, सात वर्षांची बंदिस्त शिक्षा भोगलेले व चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना पैठण येथील खुल्या कारागृहात पुढील शिक्षा भोगावी लागते. या कारागृहात या कैद्यांना गुणवत्तेनुसार कामे दिली जातात. पैठण कारागृहाकडे मोठी शेती असून कैद्यांना लागणारा भाजीपाला, अन्नधान्य हे कारागृहातील शेतीत उत्पादित केले जाते. फळभाज्या, पालेभाज्या, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन, टिश्यू केळी, ऊस व इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. ही शेती कैदीच करतात. पैठण येथील कारागृहातून राज्यभरातील कारागृहात शेतीमाल पाठविला जातो.
गुºहाळ लवकरच
कारागृहात उसापासून गूळ तयार करण्यात येणार असून गुºहाळ टाकण्याची तयारी सुरू आहे. लवकरच कारागृहात गुळाची निर्मिती सुरू होईल, असे उपमहानिरीक्षक धामणे यांनी सांगितले.
रसवंतीगृह सोबत चुलीवरची चहा आणि मिसळ पाव विक्री करणारे हे केंद्र पैठण शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर पैठण - शेवगाव या रस्त्यावर सुरू झाल्याने या रस्त्यावरील प्रवासी या केंद्रावर उसाच्या रसाचा गोडवा आणि चुलीवरील चहा व मिसळ पावचा निर्भेळ स्वाद घेत आहेत.
रसवंती व मिसळ पाव सेंटरचा शुभारंभ
कारागृहाने सुरू केलेल्या रसवंती व मिसळपावचा शुभारंभ शनिवारी कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, चंद्रकांत अलसटवार, कारागृह अधीक्षक सचिन साळवे, तुरुंग अधिकारी, बाळासाहेब जाधव, सीताराम भोकरे, बिबीषण तुतारे, बाबासाहेब गटकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कारागृहास उत्पन्न मिळणार
या उपक्रमातून कैद्यांना रोजंदारी आणि कारागृहाला उत्पन्न मिळणार असल्याने रसवंतीचा हा उपक्रम पैठण तालुक्यातील खुल्या जिल्हा कारागृहाने सुरू केला आहे, असे अधीक्षक सचिन साळवे यांनी सांगितले.
लाकडी चरकाही बनवला कारागृहात
ज्या लाकडी चरक्यापासून ऊसाचा रस काढला जात आहे, तो चरका कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी गंगाधर पांचाळ (रा. बिलोली जि. नांदेड) यांनी तयार केला आहे. ग्राहकांना दहा रुपयात एक ग्लास रस, तर वीस रुपयाला चुलीवरची खमंग मिसळ मिळणार आहे. कारागृहाच्या मालकीच्या शेतात कैद्यांनी ऊस उभा केला असून या ऊसापासून रसवंतीचा हा अभिनव उपक्रम कारागृहाने राबविला आहे, असे कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांनी सांगितले. कारागृहाच्या या उपक्रमाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामने यांनी कौतुक केले. सध्या या कारागृहात जन्मठेप झालेले २५५ कैदी शिक्षा भोगत आहेत.