जायकवाडी (औरंगाबाद ) : लेकीस माहेरी आणण्यासाठी गेलेले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांच्यावर दि. १६ जुलै रोजी जावई व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला करून जखमी केले होते. दरम्यान औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी माळी यांची प्राणज्योत मावळली. संतोष माळी हे शिवसेनेचे पिंपळवाडी गणाचे पंचायत समिती सदस्य होते.
संतोष विनायक माळी यांची मुलगी ज्योती हिचा विवाह तीन वर्षापूर्वी ईसारवाडी येथील बाळु शिंदे याच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून बाळू शिंदे व सासरकडील मंडळी बोलता व ऐकु येत नसल्याच्या कारणावरुन ज्योतीला सतत माराहाण करुन ञास देत होते. दि १६ जुलैला संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास माळी यांनी मुलास ज्योतीला घरी घरी घेऊन येण्यास सांगितले. परंतु, बाळु शिंदे व संतोष माळी यांच्यात जोराचे भांडण सुरू झाले. काही वेळाने माळी यांचे भाऊ दत्तु माळी व अशोक माळी हे भांडण सोडवून घराकडे परतत होते.
याचवेळी पाठीमागून आरोपी १) गोकुळ शिंदे २)नामदेव सांवत ३)नागु शिंदे ४)बाळु शिंदे ५)आकाश शिंदे ६)गणेश सावंत ( सर्व रा.ईसारवाडी ता.पैठण ) यांनी आरोपींनी संगनमत करुन संतोष माळी यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. या मारहाणीत दत्तु माळी, अशोक माळी हे सुद्धा जखमी झाले. यानंतर संतोष माळी, दत्तु माळी व अशोक माळी यांना औंरगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज सकाळी उपचारादरम्यान संतोष माळी यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर आज संध्याकाळी ईसारवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिसांनी आकाश शिंदे, बाळु शिंदे, गोकुळ शिंदे, नागू शिंदे या चार आरोपींना अटक केली आहे. तसेच नामदेव सावंत, गणेश सावंत हे आरोपी जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास सपोनि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय सपकाळ, शरद पवार, एकनाथ मोरे, जाकेर शेख, विजय मोरे हे करीत आहेत.