पैठण : पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक हे फक्त एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण केंद्र असून, ते रुग्णालय नाही, असा स्पष्ट खुलासा औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केल्याने पैठण शहराच्या आरोग्याची जबाबदारी कुणी घ्यायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.४१ हजार लोकसंख्या असलेल्या पैठण शहराला रुग्णालयच नाही, असे विदारक चित्र घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या खुलाशानंतर निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात ग्रामीण प्रशिक्षण पथकाच्या रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाºयांनी रुग्णालयात भौतिक सुविधा नसल्याने काम करण्यात येणाºया अडचणी समोर मांडून बेमुदत संप पुकारला होता. दरम्यान, या रुग्णालयात पिण्यासाठी पाणी नाही, शौचालय नाही, निर्जंतुकीकरणाची व्यवस्था नाही, बायोमेडिकल वेस्टची व्यवस्था नाही, परिचारिकांना हात धुण्याचीसुद्धा जागा नाही, आदींसह अनेक बाबींवर प्रकाश टाकत परिचारिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठांचे लक्ष वेधले होते.परिचारिकांच्या तक्रारी लक्षात घेता घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठांचे एक पथक नियुक्त करून पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक केंद्रात पाठविले होते. यादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन पैठण येथील ग्रामीण प्रशिक्षण पथक हे फक्त एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण केंद्र असून, हे रुग्णालय नसल्याचा स्पष्ट खुलासा केला. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पैठणच्या रुग्णसेवेस अप्रत्यक्षरीत्या नकार दिला असल्याचे मानले जात आहे. या रुग्णालयात रुग्णांसाठी सोयीसुविधा दिल्या जात नसल्याची ओरड होत असल्याने घाटी प्रशासनाने हे रुग्णालय नसल्याचा खुलासा केला आहे.दरम्यान, १९६५ पासून पैठण शहरात ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाचे रुग्णालय असल्याने राज्य शासनाचे रुग्णालय पैठणमध्ये नाही. पैठण शहराची लोकसंख्या ४१ हजार असून, पैठण शहराची ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता दरमहा पैठण शहरात तीन लाख तरंगती लोकसंख्या असते. या सर्व लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशिक्षण केंद्र असलेले पैठणचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र आजतागायत घेत होते; परंतु अचानक आमचे हे केंद्र फक्त प्रशिक्षण केंद्र असून, हे रुग्णालय नाही, असा खुलासा डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केल्यामुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली आहे....तर उपजिल्हा रुग्णालयास जागा देऊपैठण शहरात राज्य शासन उपजिल्हा रुग्णालय सुरू करणार असेल, तर ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाच्या ताब्यातील जागा या रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असेही डॉ. सुक्रे यांनी यावेळी स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय असून, पैठण तालुक्यात हे रुग्णालय कधी सुरू होईल, याचा काहीही ठावठिकाणा नसताना ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाच्या रुग्णालयात रुग्णसेवा होणे गरजेचे आहे; परंतु या रुग्णालयात सोयीसुविधा पुरविताना येणाºया अडचणी लक्षात घेता शासकीय महाविद्यालय औरंगाबाद प्रशासनाने पैठण येथील आमचे फक्त प्रशिक्षण केंद्र आहे, रुग्णालय नाही, अशी भूमिका घेतल्याने पैठणकरांच्या आरोग्याचे भवितव्य धोक्यात आले आहे.प्रपाठकांना तातडीने मुंबईला बोलावलेयाबाबत बुधवारी (दि. २०) ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून पैठणकरांच्या आरोग्याची समस्या मांडली होती. या वृत्ताची वैद्यकीय शिक्षण संचालकांनी तातडीने दखल घेत पैठण रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांना सर्व अहवाल घेऊन मुंबई येथे येण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या, गुरुवारी प्रपाठक मुंबई येथे अहवाल सादर करणार असून, पैठण येथे १०० खाटी रुग्णालय व्हावे, याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.ओपीडीत येणाºया रुग्णांची संख्या दीड लाखावरपैठणच्या या रुग्णालयात आजघडीला महिन्याकाठी सरासरी १५ हजार रुग्ण ओपीडीत उपचारासाठी येतात. म्हणजे वर्षाकाठी सरासरी दीड ते पावणेदोन लाख रुग्णांना या रुग्णालयाचा आधार वाटतो. आता घाटी प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे रुग्णांचे काय होणार, असा प्रश्न पैठणकरांसमोर उभा आहे.
पैठणकरांचे आरोग्य वाऱ्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:35 AM