वाळूज महानगर : हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन पिता-पुत्रांनी दोघांना जबर मारहाण करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.२८) सायंकाळी पंढरपुरातील तिरंगा चौकात घडली.
पवन साळवे (२६) व त्याचा मित्र प्रदीप मिसाळ (३२, दोघेही रा. पंढरपूर) यांना तिरंगा चौकात रात्री ७ वाजता हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन नितीन गिरी व त्याचे वडिल त्र्यंबक गिरी यांच्यात वाद झाला होता.
पवन व प्रदीप दोघेही या पिता-पुत्राला समजावून सांगत असताना त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. या भांडणात नितिनने लगतच्या हॉटेलमधून झाऱ्या आणुन पवनच्या डोक्यात मारला. बचावासाठी प्रदीप मिसाळ आला असता नितीनने गरम तेलाची कडई प्रदीपच्या अंगावर फेकली.
कढईतील गरम तेल प्रदीपच्या हातावर व अंगावर पडल्याने तो भाजला आहे. व्यवसायिक पद्माबाई गोसावी व नासेर पठाण यांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवत दोघा पिता-पुत्रांच्या तावडीतून दोघांची सुटका केली. या मारहाणीत पवन साळवे व प्रदीप मिसाळ दोघेही जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात पाठविले.
याप्रकरणी पवन साळवे यांच्या तक्रारीवरुन नितीन गिरी व त्र्यंबक गिरी या पिता-पुत्राविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.