विद्यार्थिनींच्या भांडणातून पालकाची मुख्याध्यापिकेला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:54 PM2019-07-26T13:54:50+5:302019-07-26T13:59:04+5:30

शिवाजीनगरमधील कलावती चव्हाण माध्यमिक शाळेतील प्रकार

Parent's beats Head Master in Aurangabad | विद्यार्थिनींच्या भांडणातून पालकाची मुख्याध्यापिकेला जबर मारहाण

विद्यार्थिनींच्या भांडणातून पालकाची मुख्याध्यापिकेला जबर मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाणीत मुख्याध्यापिकेच्या डोळ्याला, हाताला जबर मार लागला आहे.

औरंगाबाद : दोन विद्यार्थिनींचे सुरू असलेले भांडण तिसऱ्या विद्यार्थिनीने शाळेतील शिक्षकाला सांगितले. याचा राग मनात धरून विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापिका, शिक्षकाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण माध्यमिक शाळेत गुरुवारी घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण माध्यमिक शाळेत शिवाजी पोटफोडे यांची मुलगी इयत्ता नववीत शिकत आहे. या विद्यार्थिनीचे वर्गातील दुसऱ्या एका विद्यार्थिनीशी मंगळवारी (दि.२३) भांडण झाले होते. याची तक्रार तिसऱ्याच विद्यार्थिनीने मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्याकडे केली. त्यामुळे शिवाजी पोटफोडे यांच्या मुलीने तक्रार करणाऱ्या तिसऱ्या मुलीला घरापर्यंत मारत, फरपटत नेले. याउलट बुधवारी सकाळी शिवाजी पोटफोडे यांनी पत्नीसह शाळेत येत आपल्या मुलीला मारहाण केल्याचे सांगत गोंधळ घातला. या गोंधळाचा व्हिडिओ तयार करण्यात येत असल्यामुळे पालकांनी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिकेविरोधात तक्रार दाखल केली. याची माहिती झाल्यानंतर मुख्याध्यापिका संध्या काळकर यांनी पुराव्यासह पालकांनीच गोंधळ घातल्याची तक्रार नोंदवली. यामुळे चिडलेले शिवाजी पोटफोडे, त्यांची पत्नी आणि मामा जितू राऊत यांनी शाळेत येत मला आणि सहशिक्षक सतीश चौधरी यांना बेदम मारहाण केल्याची तक्रार गुरुवारी (दि.२५) मुख्याध्यापिकेने पोलिसांत दिली. यावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या मारहाणीत मुख्याध्यापिकेच्या डोळ्याला, हाताला जबर मार लागला आहे. वायर, फायटरने मारहाण केली असतानाही पुंडलिकनगर पोलिसांनी हाताने मारहाण केल्याची नोंद करून घेतली. तसेच मुख्याध्यापिकेने पुराव्यासह तक्रार देऊनही संध्याकाळपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. पोलीस मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून आल्याचा आरोपही मुख्याध्यापिकेने ‘लोकमत’शी बोलताना केला.

खूप मोठा धक्का बसला
शिवाजी पोटफोडे यांच्या मुलीच्या विरोधात वर्गातील इतर विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकांकडे सतत तक्रारी केलेल्या आहेत. या विद्यार्थिनीला अनेक वेळा समज देण्यात आली. मात्र, मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर पालकांना सांगण्यात आले. यावरून पालकांनी मुलीला समज देण्याऐवजी थेट शाळेत येत मुख्याध्यापिका, शिक्षकालाच मारहाण केली. आपल्या २० वर्षांपेक्षा अधिकच्या अध्यापनाच्या कालावधीत घडलेला हा सर्वाधिक विचित्र प्रकार आहे. विद्यार्थिनीवर संस्कार करण्याचे काम करत असताना अशा पद्धतीने मारहाण झाल्यामुळे मोठा धक्का बसला असल्याचेही मुख्याध्यापिका संध्या काळकर यांनी सांगितले.  या प्रकरणी शिवाजी पोटफोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

मुख्याध्यापक संघाकडून तीव्र निषेध
झालेली अमानुष मारहाण गंभीर आहे. दोषी व्यक्तींवर तातडीने गंभीर गुन्हे दाखल करत अटक करावी, अशी मागणी करणारे निवेदन मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२६) मुख्याध्यापक, शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे संघाने सांगितले. या निवेदनावर अध्यक्ष मनोहर सुरगडे पाटील, युनूस याकुब पटेल, किरण मास्ट, पी. एम. पवार, अमोल जगताप, सुरेखा शिंदे, अनिल पाटील आदींची नावे आहेत. 

शहरात विविध माध्यमिक शाळांमध्ये महिला मुख्याध्यापिका आहेत. शाळेत महिला शिक्षिकांनी मुलांवर संस्कार करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले आहे. या मुख्याध्यापिकांवर पालकांनी हल्ला करावा हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. माध्यमिक शिक्षण विभाग मुख्याध्यापकांसोबत आहे. मारहाण झाल्यानंतर पोलीस विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार केली जाईल.
- डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

 

Web Title: Parent's beats Head Master in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.