मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:49 PM2022-09-20T12:49:58+5:302022-09-20T12:53:28+5:30
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील घटना; प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे.
सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील पळशी येथून एका १० ते १२ वर्षीय मुलाचे एका कार चालकाने अपहरण केल्याची अफवा सिल्लोड तालुक्यात पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस पळशी येथे दाखल झाले असून तपास सुरु आहे. दरम्यान, नेमके कोणत्या शाळेतील विद्यार्थ्याचे अपहरण झाले? अपहरण झाले की ही अफवा आहे याची खात्री करण्यासाठी पोलिसांसह, शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ सर्व दिशेने तपास करत आहेत.
सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास एका खाजगी शाळेत जाणाऱ्या ५ मुलांनी प्रत्यक्ष ही घटना बघितल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार पळशी गावापासून जवळ असलेल्या एका खाजगी शाळेजवळ चॉकलेटचे आमिष दाखवून चालकाने एका मुलास बोलावले. त्यानंतर त्याच्या तोंडाला कपडा बांधत ओढत कारमध्ये बसवले. त्यावेळी कारमध्ये एक महिला व दोन पुरुष होते. मुलांनी तत्काळ याची माहिती शाळेत येऊन शिक्षकांना दिली. बघताबघता ही वार्ता संपूर्ण गावात पसरली.
यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेत गर्दी केली. प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे. याची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, उपनिरीक्षक विकास आढे कर्मचाऱ्यांसह पळशीत दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीवरून ज्या खाजगी शाळेबाबत माहितीसमोर आली तेथे पोलिसांनी तपास केला. शाळेतील वर्गांची पोलिसांनी हजेरी घेतली असता सर्व विद्यार्थी हजर होते. त्यानंतर पोलीस परिसरातील वस्तीशाळा, खाजगी शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा तपासत आहेत. मात्र, अद्याप कोणाचे अपहरण झाले हे स्पष्ट झाले नाही.
सीसीटीव्ही तपासले जात आहेत
पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. हद्दीत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. शिक्षक व पोलीस शाळेत आलेले विद्यार्थी व शाळेत न आलेले विद्यार्थी यांच्या घरी फोन करून खात्री करत आहेत. याशिवाय आस पासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
तपास सुरु आहे
नेमके कुणाचे अपहरण झाले हेच कळत नाही आता ही अफवा आहे की सत्य याचा तपास सुरू आहे. तपासाअंती खरा काय प्रकार आहे ते कळेल..
- सीताराम मेहेत्रे,पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.