चार दिवसांपासून दोन रुग्णवाहिका नागद पेट्रोल पंपावर उभ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:04 AM2021-09-13T04:04:36+5:302021-09-13T04:04:36+5:30
कन्नड : तालुक्यातील चिकलठाण व चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला काही दिवसांपूर्वीच नवीन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. मात्र, गेल्या ...
कन्नड : तालुक्यातील चिकलठाण व चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला काही दिवसांपूर्वीच नवीन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दोन रुग्णवाहिका नागद येथील पेट्रोल पंपावर उभ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णवाहिका आमदार निधीतून मिळाल्याने त्यावर आमदार उदयसिंग राजपूत यांचे नाव टाकायचे बाकी असल्याने रुग्णवाहिका येथे लावल्या गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रुग्णसेवेला प्राधान्य देण्यापेक्षा नावातच सर्वकाही आहे, अशा चर्चेला उधाण आले आहे.
तालुक्यातील चिकलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राला पोळ्याच्या दिवशी नवीन रुग्णवाहिका मिळाली. त्याच दिवशी रात्री रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका कन्नडला आली होती. मात्र, त्यानंतर चार दिवसांनी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका अचानक गायब झाली, तर दुसरीकडे नागद येथील पेट्रोल पंपावर दोन रुग्णवाहिका गुरुवारपासून उभ्या असल्याचे समोर आले असून नागरिकांनी तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली आहे. या दोन्ही रुग्णवाहिका चिकलठाण व चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या असल्याचे समोर आले आहे.
-----
दोन्ही रुग्णवाहिका आमदार निधीतल्या आहेत. सोमवारी रुग्णवाहिका मिळाल्या होत्या. मात्र, आमदारसाहेबांचा निरोप आल्याने त्या नागद येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर ते नाव टाकणार आहेत. नाव टाकले की एक-दोन दिवसात येतील. - डॉ. बाळकृष्ण लांजेवार, तालुका आरोग्य अधिकारी.