‘एसटी’अभावी मराठवाड्यातील रुग्णांचे हाल; उपचारासाठी मोठ्या शहरात जाता येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 01:44 PM2021-11-16T13:44:36+5:302021-11-16T13:46:24+5:30
ST Strike: घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णसंख्येत घट
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचे आधारवड म्हणून घाटी रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयाची ओळख आहे. दररोज मोठ्या संख्येने येणारे बाहेरगावचे रुग्ण एसटी बससेवेअभावी येऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी, या दोन्ही ठिकाणी रोजच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज दोन ते तीन हजारांच्या घरात रुग्ण येतात. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागासह मराठवाडा आणि लगतच्या भागातून रुग्ण येतात. ओपीडीत आल्यानंतर आवश्यकतेनुुसार काही रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात येते. मात्र, सध्या ओपीडीतील रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. कर्करोगावर नियमितपणे उपचार घ्यावे लागतात. त्यासाठी ठरावीक दिवशी रुग्णालयात यावे लागते. परंतु सध्या शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णसंख्येवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. दिवाळीतील सुट्यांबरोबर एसटी बंद असल्याने ये-जा करण्यासाठी वाहतूक सुविधाच नसल्याने उपचार पुढे ढकलले जात आहेत.
ओपीडीत रोज ३ हजार रुग्ण
घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारण तीन हजारांपर्यंत रुग्ण उपचारासाठी येत असतात. दिवाळीतील सुट्यांत नागरिक गावी जातात. त्यामुळे ही संख्या सध्या कमी असू शकते. त्याबरोबर वाहतूक सुविधेअभावीदेखील सध्या उपचारासाठी येण्याचे टाळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, उपअधिष्ठाता, घाटी
घाटीतील ओपीडीतील रुग्णसंख्या
तारीख- रुग्ण
८ नोव्हेंबर-१२००
९ नोव्हेंबर-९५०
१० नोव्हेंबर -८५०