घाटीतील रुग्ण,नातेवाईकांनी सोबत पाणीही आणावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:17 AM2018-06-02T00:17:21+5:302018-06-02T00:18:14+5:30
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्ण, नातेवाईकांना मागील तीन दिवसांपासून पिण्यासाठी थेंबभर पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्ण, नातेवाईकांना मागील तीन दिवसांपासून पिण्यासाठी थेंबभर पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे. पाण्याच्या बाटल्या घेऊन रुग्णांचे नातेवाईक घाटी परिसरात फिरताना दिसून येत आहेत. पाणीच नसल्याने प्रत्येक वॉर्डातील शौचालयांची अवस्था एवढी भयानक झाली आहे की, रुग्णांना दुर्गंधीनेच मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. घाटीत दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी सोबत पाणीही आणावे, असे म्हणण्याची वेळ सध्या आली
आहे.
घाटी रुग्णालयाकडे पाण्याचे कोणतेच स्रोत नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर संपूर्ण रुग्णालयाची भिस्त अवलंबून आहे. मागील तीन महिन्यांपासून घाटी प्रशासन अपुºया पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेला वारंवार विचारणा करीत आहे. मागील आठवड्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनीही स्वत: रुग्णालयात जाऊन पाहणी केली. पाणी प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतरही पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही.
बुधवार ते शुक्रवारपर्यंत रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात पाण्याचा अक्षरश: ठणठणाट होता. वॉर्डात मिळणारे पाणी एवढे गरम असते की, ते एक घोटही कोणी पिऊ शकणार नाही, अशा परिस्थितीत रुग्ण, नातेवाईक पाणी पीतच
होते. विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाºया प्रशासनाने प्रत्येक आठ ते दहा वॉर्डांसाठी एक वॉटर कूलरही बसविला नाही. घाटीच्या मेडिसीन बिल्डिंगमध्ये वॉटर कूलरमुळे रुग्ण, नातेवाईकांना किमान थंड पाणी तरी पिण्यासाठी मिळते.
रमजान महिन्यात अनेक रुग्णांचे नातेवाईक उपवास ठेवतात. त्यांना पहाटे चार वाजता पाणीच मिळत नसल्याने बरेच हाल होतात. सायंकाळीही उपवास सोडण्यासाठी बाजारातून दहा रुपयांची पाण्याची बाटली आणण्याशिवाय पर्याय नसतो.
प्रचंड उकाडा तरी...
घाटीतील अनेक वॉर्डांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होतात. त्यामुळे वॉर्डांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. रुग्णांचा हा प्रचंड भार प्रशासन कसाबसा सोसत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे अनेक वॉर्डांमध्ये उकाडाही तेवढाच वाढला आहे. रुग्णांसह नातेवाईकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रुग्णांनी आपला वैयक्तिक पंखा आणला तरी प्रशासन ते लावू देत नाही. नवजात शिशूंना या उकाड्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. प्रत्येक वॉर्डात प्रशासनाने कूलर लावले आहेत. हे कूलर फक्त डॉक्टर, नर्सच वापरू शकतात. रुग्णांसाठी एकाही ठिकाणी कू लरची व्यवस्था नाही.