औरंगाबादमध्ये ६५ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 08:09 PM2018-10-01T20:09:40+5:302018-10-01T20:10:42+5:30

जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

Penalties for 65,000 drivers in Aurangabad | औरंगाबादमध्ये ६५ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

औरंगाबादमध्ये ६५ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

googlenewsNext

औरंगाबाद : नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांवर कारवाईसाठी शहर पोलीस दलात आणखी एका विभागाची भर टाकण्यात आली, असे असले तरी प्रत्यक्षात मात्र गतवर्षीच्या तुलनेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणारी कारवाई निम्म्यावर आल्याचे समोर आले. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही रोज भर पडते आहे. वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज, छावणी, सिडको आणि शहर विभाग क्रमांक १ आणि २, असे पाच विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक आहेत. १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी या कालावधीत झालेल्या कारवाईच्या तुलनेत ही कारवाई निम्मीच आहे. गतवर्षी जानेवारी ते आॅगस्टदरम्यान नियम मोडणाऱ्या १ लाख २० हजार ५०८ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले होते. या वाहनचालकांकडून ३ कोटी १९ लाख ७२ हजार ३५० रुपये दंड वसूल केला होता. 

एका वाहतूक विभागाची पडली भर
गतवर्षी शहरात चार वाहतूक विभाग होते. यावर्षी यात आणखी एका विभागाची भर पडली. त्यासाठी पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी, कर्मचारीही देण्यात आले. असे असले तरी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाईत मोठी घट झाल्याचे दिसून येते.

अडीच हजार वाहन- चालकांनी भरला आॅनलाईन दंड
सेफ सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोस्टामार्फत घरपोच नोटिसा पाठविण्याचा उपक्रम एक महिन्यापूर्वी सुरू झाला. वाहनचालकांना अ‍ॅक्सिस बँक आणि पोस्टात दंडाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. वाहनचालकांस घरपोच नोटीस मिळाल्यानंतर १४ दिवसांत दंड भरणे बंधनकारक आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कोर्टात खटला दाखल केला जातो. महिनाभरात २ हजार ६२४ वाहनचालकांनी १ लाख ७७ हजार ५१८ रुपये दंड बँक आणि पोस्टात जमा केला.

बंदोबस्तामुळे कारवाईला वेळच नाही
जानेवारीपासून आॅगस्टपर्यंत शहरात झालेल्या विविध दंगलींच्या काळात वाहतूक पोलीस बंदोबस्तात होते. परिणामी, कारवाई घटली.
-एच.एस. भापकर, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग

Web Title: Penalties for 65,000 drivers in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.