एकास अंगावर पेट्रोल टाकून पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:59 PM2019-06-05T22:59:58+5:302019-06-05T23:00:08+5:30
पैसे मागितल्याच्या कारणावरुन एकास अंगावर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना मंगळवारी वाळूज येथे घडली.
वाळूज महानगर : पैसे मागितल्याच्या कारणावरुन एकास अंगावर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना मंगळवारी वाळूज येथे घडली. दरम्यान, लोकांनी वेळीच आग विझविल्याने तो बचावला. या प्रकरणी एक जणाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश नामदेव दिवेकर (३२, रा. पंढरपूर) याची कामाच्या निमित्ताने दत्ता कराळे व त्याची पत्नी ज्योतीशी ओळख झाली होती. त्यावेळी कराळे दाम्पत्य पंढरपूर येथे रहात होते. दोघांनी साडेतीन हजार रुपयांत दुचाकी विकत घेतली.
यावेळी दिवेकरने ३ हजार तर कराळेने ५०० रुपये दिले होते. कराळे हा उर्वरित पैसे पगारातून दिवेकर याला देईल, असे ठरले होते. काही दिवसानंतर कराळे दुचाकी संबंधित व्यक्तीस परत करुन पैसे घेतले. पंढरपूर येथील खोली खाली करुन वाळूजला राहण्यास गेला.
दिवेकर मंगळवारी कराळेने त्याच्याशी वाद घालत घरातील पेट्रोलची बाटली आणून दिवेकरच्या अंगावर ओतली व आगकाडीने पेटवून दिले. अंगावरील कपड्याने पेट घेताच दिवेकरने मदतीसाठी आरडा ओरड केली. तेव्हा घटनास्थळावरील ज्योती कराळे व अन्य नागरिकांनी तात्काळ दिवेकरच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली.
या प्रकरणी दत्ता कराळे याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी आरोपी कराळे यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.