औरंगाबाद : जालना रोडवर महापालिकेच्या जागेवर पक्की दुकाने बांधून वर्षानुवर्षे हजारो रुपये भाडे वसूल करणाऱ्या मालमत्ताधारकांवर मंगळवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव पथकातर्फे १५ पेक्षा अधिक अतिक्रमणे पाडण्यात आली. महापालिकेने या कारवाईत एमआयडीसी प्रशासनाचीही मदत घेतली.जालना रोडवरील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. पोलिसांकडून या रस्त्यावर चौक बंद करणे, वाहतुकीला शिस्त लावणे आदी प्रयोग सुरू आहेत. रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळेही वाहतुकीला बराच अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी अनेकदा मनपाला पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी एमआयडीसी प्रशासनाचे सहकार्य घेऊन जोरदार कारवाई केली. एपीआय कॉर्नर येथे अनेक वर्षांपासून पक्की बांधकामे करण्यात आली होती. एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक २४ आणि २५ मध्ये आरसीसीची दुकाने बांधण्यात आली होती. त्याचप्रमाणे याच रस्त्यावर माठ, फुल विक्रेत्यांनी मोठ्या भूखंडांवर अतिक्रमण केले होते. धूत हॉस्पिटलजवळ चहा, रसवंती आणि खाणावळचालकांनी मोठ्या जागा व्यापल्या होत्या. एकूण १५ अतिक्रमणे मनपातर्फे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई प्रशासकीय अधिकारी बोईनवाड, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, एमआयडीसीचे अधिकारी सुधीर सुत्रावे, सुनील दांडारे, अरुण पानझडे आदींनी केली.
जालना रोडवरील पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त
By admin | Published: May 18, 2016 12:02 AM