लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील नबी म्युझिअम आॅफ द आर्टस् गॅलरीमध्ये २० जुलै ते १० आॅगस्टदरम्यान ‘व्हिलेज व्ह्यू’ या प्रकारातील आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन होत आहे. यात मूळचे औरंगाबादचे आणि सध्या मुंबईच्या जे.जे. स्कूल आॅफ फाईन आर्टस्मध्ये अधिव्याख्याते असलेले राहुल धोंडीराम थोरात यांनी रेखाटलेल्या चित्रांना स्थान मिळाले आहे.
राहुल थोरात हे सोसायटी आॅफ कोरिया इलस आर्ट अर्थात ‘सोकी’ या दक्षिण कोरियातील संस्थेचे मानद सदस्य आहेत. याच संस्थेतर्फे ४२ वी ‘व्हिलेज व्ह्यू’ ही चित्र मालिका भरवली जात आहे. ‘व्हिलेज व्ह्यू’ ही चित्र मालिका अमूर्त निसर्गचित्रण प्रकारातील आहे. गावखेड्यातील उबदार रंगसंगती, नैसर्गिक परिसर, रचनेची कलात्मक मांडणी या मालिकेत पाहायला मिळतात.मूळचे औरंगाबादचे असलेले राहुल थोरात यांनी १९९८ मध्ये बॅचलर आॅफ फाईन आर्ट आणि २००० मध्ये मास्टर आॅफ फाईन आर्टची पदवी संपादित केली आहे. तंबाखूविरोधी अभियानात सामाजिक विषयावरील त्यांची पोस्टर्स गाजली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही थोरात यांनी आपल्या कलात्मक कृतीची छाप टाकली असून, दक्षिण कोरियातील ‘सोकी’ संस्थेने घेतलेल्या विविध स्पर्धांत त्यांनी पुरस्कार पटकावले आहेत. १९९८ मध्ये राजस्थानमधील ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. २०११ मध्ये केंद्र सरकारचा आणि २००८ मध्ये कला संचालनालयाचा पुरस्कार मिळालेला आहे. यानिमित्ताने थोरात यांची कलाकृती सातासमुद्रापार जात आहे.