औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर जास्त सुविधा नसतानाही अफाट दर आकारण्यात आले होते. याविषयी ‘लोकमत’ने पाठपुरावाही केला. त्यानंतर आ. अंबादास दानवे व उदयसिंह राजपूत यांनीही हा प्रश्न लावून धरला. त्यानंतर आता १ मेपासून विभागीय क्रीडा संकुलातील दर कमी होणार आहे. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पदकविजेत्या खेळाडूंना विभागीय क्रीडा संकुलात सरावासाठी नियमित दराच्या २५ टक्के सवलत देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
‘लोकमत’ने फोडली वाचाकोरोना काळात प्रशिक्षकांचे हाल झाले, अनेक क्रीडा शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या. भरीस भर म्हणजे प्रशिक्षणास येणाऱ्या खेळाडूंसाठी शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली. याविषयी ‘लोकमत’ने ‘भरमसाठ शुल्क; खेळाडूंची विभागीय क्रीडा संकुलाकडे पाठ’, ‘सदस्यांना विश्वासात न घेताच शुल्कवाढीचा निर्णय’, ‘खेळाडूंकडून घेतले जाते तिपटीने शुल्क’ या शीर्षकाखाली शुल्कवाढीच्या समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर पालक, प्रशिक्षक आणि संघटकांत असंतोषाची भावना निर्माण झाली होती. आ. अंबादास दानवे व उदयसिंह राजपूत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याच मुद्द्यावर जोर दिला. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तत्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालक यांना शुल्क कमी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुधारित दरानुसार बॅडमिंटन १३००, मॉर्निंग वॉक १५०, ॲथलिट ४००, बास्केटबॉल ४००, कराटे ४००, क्रिकेट ८००, फुटबॉल ४००, स्केटिंग ४००, वुशू, तायक्वांदो ४००, जिम्नॅस्टिक ५००, रायफल शूटिंग १३००, बॉक्सिंग ५५०, तलवारबाजी ४००, वेटलिफ्टिंग ४००, खो-खो ३००, हॉकी ४००, ज्युदो ४००, कबड्डी ३००, आर्चरी ४००, बेसबॉल सॉफ्टबॉल ४००.