सुखद ! दिल्लीपेक्षा औरंगाबादची हवा चांगली; प्रदूषण नियंत्रण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 12:31 PM2020-11-18T12:31:52+5:302020-11-18T12:38:29+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होताना तुलनात्मक विचार केल्यास कोरोना संक्रमण रोखण्यात दिल्लीपेक्षा औरंगाबादेची हवा काहीशी आरोग्यदायी ठरेल
- योगेश पायघन
औरंगाबाद : भारतात कोरोनासोबत वायुप्रदूषणाशीसुद्धा दुहेरी लढा द्यावा लागत आहे. दिल्लीसह उत्तर भारतात हवेचे प्रदूषण अधिक असल्याने तेथे हा दुहेरी धोका अधिक तीव्र आहे. औरंगाबादमधील हवेतील प्रदूषण दिल्लीपेक्षा कमी असल्याने कोरोनाची दुसरी लाट आली, तरी त्याचा परिणाम दिल्लीपेक्षा औरंगाबादेत कमी दिसेल, असा अंदाज पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला.
कोरोना आणि वायुप्रदूषणाच्या दुहेरी संक्रमणात नागरिकांनी विशेष काळजी घेण्यासाठी जनजागृतीही तितकीच गरजेची आहे. विशेषतः ज्यांना फुफ्फुस व श्वसनासंबंधी आजाराने ग्रासले आहे, त्यांनी स्वत:ला जपाने. कारण कोरोनाची लागण झाल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तर प्रदूषणाने श्वसनातही अडथळा निर्माण होतो. तीव्र श्वसनविकाराचा आजार सीओपीडी आणि दमा, अस्थम्याचे रुग्ण अधिकच वाढत असताना प्रदूषणासंबंधी अधिक सावधानी बाळगणे गरजेचे आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसे आकुंचन पावतात. कमजोर होतात. त्यामुळे कोरोनादरम्यान, न्यूमोनियासारख्या आजाराची गुंतागुंत होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशनकडे दुर्लक्ष व्हायला नकाे. शिवाय प्रदूषण नियंत्रण गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
लाॅकडाऊनमध्ये औरंगाबादच्या हवेच्या गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाल्याने प्रत्येकाला आरोग्यदायी मोकळा श्वास घेता आला. हे जूनमध्ये अर्बन मिशनच्या अहवालावरून स्पष्ट झाले होते. अनलाॅकनंतर प्रदूषणात वाढ होताना दिसत असली तरी दिल्लीच्या तुलनेत येथील प्रदूषण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होताना तुलनात्मक विचार केल्यास कोरोना संक्रमण रोखण्यात दिल्लीपेक्षा औरंगाबादेची हवा काहीशी आरोग्यदायी ठरेल, असे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सतीश पाटील यांनी सांगितले. अतिसूक्ष्म धूलिकण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि कार्बन मोनाक्साईड या प्रदूषकांच्या ठरलेल्या मर्यादांत दिल्लीपेक्षा औरंगाबाद मर्यादेच्या काठावर तर दिल्ली तीव्र अतितीव्र श्रेणीत मोडते. यात अनेक घटक मोडतात. उद्योग, वाहनांची संख्या आणि तापमानाचाही विचार झाल्यास औरंगाबादेतील प्रदूषण कमी आहे.
थंडी ठरू शकते पोषक
हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या केलेल्या श्रेणींमध्ये औरंगाबादची हवा चांगली आणि समाधानकारक श्रेणीत मोडते, तर दिल्लीची हवा अतिखराब व तीव्र खराब श्रेणीत कायम असते. त्यातील प्रदूषकांचे प्रमाण औरंगाबादच्या तुलनेत अधिक असते. ते आरोग्यास अपायकारक ठरते, तर तेथील हवामान, भाैगोलिक परिस्थिती, हवा वाहण्याचा वेग आणि दिशा, या औरंगाबादपेक्षा भिन्न आहेत. तेथील थंड हवा कोरोना संक्रमण वाढीसाठी पोषक ठरू शकते. तुलनेत औरंगाबादमध्ये हे प्रमाण कमी असण्याचा अंदाज आहे.
-सतीश पाटील, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद