वाळूज महानगर : वडगावच्या पाझर तलावात चक्क प्लॉटिंग पाडली जात असून, काही लोकांनी सिमेंट खांब रोवून संरक्षक भिंतीचे काम सुरु केले आहे. याकडे जिल्हा प्रशासनासह सिंचन विभागाने लक्ष देण्याची मागणी सजग नागरिकांतून केली जात आहे.
गावचा पाणीप्रश्न सुटवा व १९७२ च्या दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने काही शेतकऱ्यांच्या जमीन घेवून पाझर तलावाची निर्मिती केली. यावेळी शासनाने तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला दिला. परंतू तलावात गेलेली जमीन सातबाºयावरुन कमी झाली नाही. विशेष म्हणजे संबंधित जि.प.च्या सिंचन विभागाने तलावाची हद्दही निश्चित केलेली नाही. तलावाची हद्द निश्चित करण्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीने सिंचन विभागाला पत्रव्यवहारही केला आहे.
परंतु ग्रामपंचायतीच्या या पत्राकडे सिंचन विभागाने लक्ष दिले नाही. या भागात नागरी वसाहती वाढत असल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता तलावात गेलेल्या जमिनीवरही काही जण सातबाºयाच्या आधारे मालकी हक्क सांगत असून, त्यावर प्लॉटिंग पाडली जात आहे. सध्या साजापूर रस्त्यावर तलावातच बिंधास्तपणे प्लॉटिंग टाकली जात आहे. तलावात काहींनी प्लॉटिग करुन संरक्षण भिंती बांधून घेतल्या असून, काहींनी सिमेंटचे खांब रोवले आहेत. तलावाचा जवळपास अर्धा भाग या अतिक्रमणाखाली आला आहे. विशेष म्हणजे काही प्लॉटिंगधारकांना सिंचन विभागाने परवानगी दिल्याची चर्चा आहे.
गावातील जलस्त्रोतांना या तलावाचा मोठा फायदा होत असल्याची गरज ओळखून २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायतीने जवळपास ५ लाख रुपये खर्च करुन तलावाची उंची वाढविली होती. तसेच पाळूला दगडाची पिचिंग केली होती. परंतु मुरुम माफिया तलावातील मुरुमाबरोबरच पाळूचे दगडही घेवून जात आहेत. वाढते अतिक्रमण व मुरुमचोरीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
भविष्यात मोठा पाऊस झाल्यास व तलावात मोठे पाणी साचल्यास पाळू कोणत्याही क्षणी फुटून तलावातील पाणी गावात शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे तलावातील अतिक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. या विषयी सरंपच उषा एकनाथ साळे म्हणाल्या की, ग्रामपंचायतीने सिंचन विभागाकडे तलावाचे क्षेत्र मोजून देण्याची मागणी केली आहे. परंतू सिंचन विभागाकडून प्रतिसाद मिळत नही.