औरंगाबाद: 'कुंपणच शेत खात' तेव्हा, अशी म्हण आपण नेहमीच आयकत असतो. मात्र औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील सहायक फौजदाराने ही म्हण प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत चक्क सहायक फौजदारच जुगार खेळताना आढळून आल्याच्या प्रकार समोर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या बाजूलाच बऱ्याच दिवसांपासून खुलेआम जुगार अड्डा सुरु होता. मात्र स्थानिक पोलिसांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचे आरोप नेहमीच होत होते. त्यामुळे अखेर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पथकाने या ठिकाणी रविवारी रात्री अचानक छापा टाकला. या छाप्यात वीरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले.
औरंगाबाद ग्रामीण विशेष पथकाला वीरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेल्या शाहरूख टी स्टॉलमध्ये काही जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता वीरगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकूण नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकणी पाचही जुगाऱ्यांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे जुगार अड्डा सुरु होता का ? त्यामुळे ठाणेप्रमुखावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.