छत्रपती संभाजीनगर : धो धो बरसणाऱ्या पावसात पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह बुधवारी रात्री ११ ते २ वाजेच्या दरम्यान 'ऑपरेशन ऑलआउट' राबवले. तपासणीत गैरप्रकारांमध्ये तब्बल ३८ गुन्हे नोंदविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये ६३३ पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात ५४५ अंमलदार, तर ८८ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
पोलिस आयुक्त मनोज लोहिया हे पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. पोलिस निरीक्षकांसोबत झालेल्या क्राइम मीटिंगनंतर आयुक्तांनी शहरभर 'ऑपरेशन ऑलआउट' राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी रात्री हे ऑपरेशन राबविण्यात आले. धो धो बरसणाऱ्या पावसामध्ये नाक्या-नाक्यांवर येणाऱ्या गाड्यांची पोलिस तपासणी करीत होते. त्यात दारूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या २५ जणांवर कारवाई केली. एका जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारण्यात आला. शस्त्र बाळगून फिरणाऱ्यांकडून ५ शस्त्र जप्त केली. फरार असलेल्या दोन, विविध गुन्ह्यांत हवे असलेल्या सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्याशिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवरील १२४ आरोपींची पोलिसांनी घरी जाऊन तपासणी केली. त्याशिवाय ६२२ वाहनांची तपासणीही करण्यात आली आहे. ही ऑपरेशन पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, दीपक गिऱ्हे आणि शीलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. यामध्ये सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे, सायबर, वाहतूकसह सर्व शाखांसह पोलिस ठाण्याचे निरीक्षक सहभागी झाले होते.
पोलिस आयुक्त ऑन फिल्ड‘ऑपरेशन ऑलआउट’ पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाकाबंदीसह इतर ठिकाणी पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवाईच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच फिल्डवरील अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्याची माहिती शहर पोलिसांतर्फे देण्यात आली.