पोलिसांच्या सतर्कतेने टळला साखरपुड्यामध्ये होणारा बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 07:09 PM2018-04-17T19:09:59+5:302018-04-17T19:11:37+5:30
साजापुरातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा साखरपुड्यात होणारा नियोजित बालविवाह पोलीस पथकाने केलेल्या समुपदेशनामुळे टळला. नातेवाईकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्न करण्याची हमी पोलिसांना दिली.
औरंगाबाद : साजापुरातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा साखरपुड्यात होणारा नियोजित बालविवाह पोलीस पथकाने केलेल्या समुपदेशनामुळे टळला. नातेवाईकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्न करण्याची हमी पोलिसांना दिली.
साजापुरातील ही अल्पवयीन मुलगी शहरातील महाविद्यालयात ११ वीत शिकते. नेवासा तालुक्यातील नात्यातील तरुणाबरोबर तिचा विवाह ठरला होता. १८ एप्रिलला साखरपुड्यातच विवाह उरकण्याची पालकांनी तयारी करून नातेवाईकांना तोंडी निमंत्रणेही दिली होती. या बालविवाहाची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने कुणीतरी महिला तक्रार निवारण केंद्राला माहिती दिली. ग्रामीण महिला तक्रार निवारण केंद्रातील फौजदार मनीषा लटपटे यांनी ही माहिती दामिनी पथकाला दिली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पोहेकॉ. लता जाधव, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या फौजदार आरती जाधव, पोकॉ. संतोष जाधव आदींच्या पथकाने सोमवारी साजापुरातील ते घर गाठून कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली.
पालकाचा जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न
आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे मुलीचे लग्न लवकर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिली. आम्हाला मुलगा नसून पाचही मुलीच आहेत. आई गृहिणी, तर वडील बांधकाम मिस्तरी आहेत. मोठ्या मुलीचे लग्न करून जबाबदारीतून मुक्त व्हावे, यासाठी तिचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुलीसह तिचे आई-वडील व मामाला पोलिसांनी समुपदेशन करण्यासाठी ठाण्यात आणले. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा मुलीने यावेळी व्यक्त केली. समुपदेशनानंतर मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न सज्ञान झाल्यानंतरच करण्याची लेखी हमी पोलिसांना दिली. तहसीलदारांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती फौजदार जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.