औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदासाठी राजकीय लॉबिंग; नियुक्तीला होणार उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 02:43 PM2020-08-13T14:43:51+5:302020-08-13T14:45:45+5:30
जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत.
औरंगाबाद : तीन दिवसांपासून जिल्हाधिकारीपदासाठी कुणाचेही नाव निश्चित झालेले नाही. राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब होत असल्याचे चित्र आहे. कालपर्यंत या पदासाठी दोन अधिकाऱ्यांची नावे होती, आता तो आकडा पाचहून अधिक झाला आहे.
महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, प्रेरणा देशभ्रतार, जे. श्रीकांत, एम.डी. सिंग यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे यामध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. जिल्हाधिकारी नियुक्तीसाठी पुण्यामध्ये ज्याप्रमाणे राजकीय लॉबिंग सुरू झाली आहे, त्याच पद्धतीने औरंगाबादमध्येही लॉबिंग सुरू झाल्याची माहिती महसूल वर्तुळातून समोर येत आहे. पुण्यातही अजून जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, चव्हाण हे जिल्ह्यातील एका राज्यमंत्र्याचे कधीकाळी ओएसडी होते. त्यामुळे त्यांचे नाव १० ऑगस्टपूर्वीपासून चर्चेत आहे. देशभ्रतार या शिस्तप्रिय अधिकारी असल्यामुळे येथील राजकीय परिस्थितीला परवडणाऱ्या नाहीत, म्हणून त्यांच्या नावाला विरोध होतो आहे. एम.डी. सिंग यांचे नाव शिवसेनेतील एका नेत्याने लावून धरले आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जे. श्रीकांत हे औरंगाबादला येण्यास इच्छुक नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात कमी राजकीय ताकद असली तरीही येथे जिल्हाधिकारी नियुक्ती करताना या दोन पक्षांची मर्जीदेखील महत्त्वाची असणार आहे.
नियुक्तीला उशीर
शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थिती प्रशासनातील महत्त्वाच्या बदल्या एप्रिल-मेपासून थोपविण्यात आल्या होत्या; परंतु बदली केल्यानंतर तातडीने नवीन अधिकारी नियुक्त करण्याबाबत आगामी राजकीय समीकरणांचा विचार होत असल्याचे दिसते आहे. यातूनच जिल्हाधिकारी नियुक्तीला उशीर होतो आहे. ही नियुक्ती कधी होते, याकडे राजकीय आणि अधिकारी मंडळींचे लक्ष लागले आहे.
सुनील चव्हाण यांचे नाव आघाडीवर
महावितरणचे औरंगाबाद येथे कार्यरत सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांचे नाव सध्या जिल्हाधिकारी म्हणून आघाडीवर असल्याची माहिती मुंबइतील सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकारीपदाच्या नावाची घोषणा या आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरावे असे या नेत्यांना वाटत आहे. त्यादृष्टीने चव्हाण यांच्या नावावर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे दुमत होण्याचे कारण दिसत नाही. हिंगोलीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचेही नाव समोर येत आहे. निवृत्तीच्या उंबरठयावर त्यांना नियुक्ती मिळू शकते याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, त्यांचे नाव राजकीय क्षेत्राकडून समोर आले नसल्याची माहिती आहे.
मनपा आयुक्तांचेही नाव होते चर्चेत
बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी कुणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांत चर्चा झाली. त्यामध्ये मनपा प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांचे नावही पुढे आले; परंतु ते आयुक्तपदी येऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.