औरंगाबाद: राज्यात जोरदार सत्तासंघर्ष होऊनसुद्धा कोणताही पक्ष सत्तेत विराजमान होऊ शकला नाही. मंगळवारी सायंकाळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. गेल्या अठरा दिवसांपासून राज्यात जे सत्तानाट्य रंगले आणि त्याची समाप्ती राष्ट्रपती राजवटीत झाली, याबद्दल औरंगाबादच्या सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. लोकनियुक्त सरकार यायला हवे होते इथपासून चारही प्रमुख पक्षांनी राज्यातील जनतेच्या भावनांचा खेळ केल्याच्या भावना व्यक्त झाल्या. कुणी म्हणाले, राजकीय पक्षांना जनतेची काळजी नाही, कुणी म्हणाले, राज्यपालांनी अतिघाई केली तर कुणी म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार ? राष्ट्रपती राजवटीमुळे काही विकासकामे मार्गी लागण्याचा वेग मंदावणार आहे. सामान्यांनी व्यक्त केलेली ही चिंता...
शेतकऱ्यांचे नुकसानलवकर सरकार स्थापन व्हावे, ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. त्यासाठी नागरिकांनीही कौलही दिला आहे. आता तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. नागरिक लोकप्रतिनिधींना माफ करणार नाही. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहे.- संतोष पडोळ, भांडे विक्रेते
हा जनतेचा अपमानराज्यात सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली, ही परिस्थिती म्हणजे जनतेचा अपमान आहे. शेतकरी संकटात आहे आणि राजकीय नेते मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. राज्यातील प्रश्न, समस्या सुटण्यासाठी कारभारी पाहिजे. मात्र यांच्या भांडणात राष्टÑपती राजवट लागू झाली आहे. सरकार स्थापनेअभावी सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे.- तुकाराम पवार, टेलर
तरुणाई रोजगाराच्या प्रतीक्षेतनागरिकांनी मतदान करून लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे. नागरिकांच्या मतांचा आदर दाखविला पाहिजे. जनतेची कामे होतील, या आशेने निवडून दिले; परंतु तसे होताना दिसत नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीत. राज्यात बेरोजगारीसह अनेक प्रश्न आहेत. तरुणाई नोकर भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे हे प्रश्न कधी निकाली निघणार, असा प्रश्न आहे.- कृष्णा तळेकर, अभियंता
पुन्हा मतदानाची वेळ नकोकोणी म्हणतात सरकार स्थापन करू, कोणी म्हणतो विरोधी पक्षात बसू , तर कोणी राष्ट्रपती राजवट लागू होईल म्हणत आहे. या सगळ्यात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे; परंतु सध्याची अवस्था पाहता, हा सातबारा कोरा होणार की नाही, याचे उत्तर कोणी देऊ शकणार नाही. काही करा; पण पुन्हा मतदानाची वेळ आणू नका.- आनंद चंदनशिव, व्यावसायिक
जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेलराज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला स्पष्ट जनादेश दिलेला आहे. सरकार स्थापन करणे हे दोन्ही पक्षांचे कर्तव्य होते. प्रचारात महायुतीला मत देण्याची मागणी केली. मात्र, दोन्ही पक्षांत मुख्यमंत्री पदावरून नेमके काय ठरले होते हे प्रचारातही कोणी सांगितले नाही. निकालानंतर ठरल्याचे बाहेर आले. राष्ट्रपती राजवटीसाठी हेच दोन्ही पक्ष जबाबदार आहेत.- सार्थक माने, वकील, जिल्हा न्यायालय
भाजपने शब्द फिरवला;त्यांना धडा शिकवला पाहिजेभाजप-शिवसेनेत पद आणि जबाबदारीचे समसमान वाटप ठरले होते. मात्र, निकालानंतर भाजपने शब्द फिरवला आहे. त्यामुळे या पक्षाला सत्तेबाहेर ठेवत इतर तीन पक्षांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सत्ता स्थापन केली पाहिजे. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना हा खेळ करणे दुर्दैवी आहे.- रवी कदम, संशोधक विद्यार्थी, विद्यापीठ
राष्ट्रपती राजवटीसाठी मतदान केले नाही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, यासाठी मतदारांनी मतदान केले नाही. मतदारांनी युतीला मतदानात स्पष्ट आघाडी दिली आहे. आघाडी मिळूनही सरकार स्थापन केले गेले नाही. अस्थिर परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी भाजप-शिवसेनेची आहे. -अशोक शिंदे (हमाल)
सरकार कोणतेही असो, बेरोजगारी कमी करावीराज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस कोणाचेही सरकार असो. सर्वसामान्यांसाठी सर्व सारखेच आहेत. फक्त सरकार बनविताना ते ५ वर्षे टिकेल, असे स्थिर बनले पाहिजे. लवकर सरकार बनावे. बेरोजगारी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. -इम्रान पठाण (करदोडे विक्रेता)
स्थिर सरकार व्हावे कोणी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला तरी काही फरक पडत नाही. फक्त एकदा पाठिंबा दिला तर ५ वर्षे स्थिर सरकार द्यावे, मध्येच पाठिंबा काढून घेऊ नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. याकडे नवीन सरकारने लक्ष द्यावे. -मेहबूब शेख (बांगडी विक्रेता)
अस्थिरतेला युती जबाबदार भाजप-शिवसेनेच्या युतीला बहुमत दिले असतानाही त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कोणी बोलून दाखवत नाही. मात्र, सर्वांच्या मनात राग आहे. अस्थिरतेला युतीच जबाबदार आहे. -राजू जैस्वाल (फरसाण विक्रेता)
जनमताचा आदर करा सर्वाधिक जागा भाजप व त्यानंतर शिवसेनेच्या आल्या आहेत. राजकारणातील आम्हाला जास्त कळत नाही; पण आता राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेनेचे सरकार आले, तर हे जनमताच्या विपरीत आहे. जनमताचा आदर करावा. आमचा अपेक्षाभंग झाला आहे. -प्रेम भागेल महाराज (जिलेबी विक्रेता)
जनतेची चिंता कोणालाच नाहीपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासकीय मदत देऊनही शेतकरी उभा राहू शकत नाही. महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. आर्थिक मंदीने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिक सरकारकडेच आशेने बघतो. राज्यात कोणताच राजकीय पक्ष सरकार स्थापन करीत नाही, म्हणजे काय? सर्वच राजकीय पक्षांना जनतेची अजिबात काळजी नाही, असे दिसते.-अकबर खान, वेल्डिंग व्यावसायिक
मत घेण्यासाठीच जनता हवी का?निवडणुका आल्यावर सर्वच राजकीय पक्षांना जनतेची आठवण येते. त्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्याच धुंदीत असतो. राज्याने कोणत्याच एका पक्षाला जनादेश दिला नाही. ज्यांना जनादेश दिला ते पदासाठी भांडत बाजूला झाले. विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश मिळालेले सत्तेसाठी पुढे आले. जनतेचा कौल लक्षात घेऊन तरी वागावे.-शेख बाबर, व्यापारी
सब उलटेसुलटे कामा हंै ये तमाशा चल रहा हैं. सब उलटेसुलटे कामा हैं साब. इन लोगों को सिर्फ कुर्सी चाहिए. पैसा चाहिए. पब्लिक से इनको कुछ लेना-देना नहीं हैंनुसरत, पेट्रोल पंपावरील कर्मचारी
शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजेराज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यात सक्षम सरकार असणे आवश्यक आहे. मात्र, सर्वच पक्ष यात नापास झाले आहेत. जनतेच्या भल्यासाठी कोणत्याही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करायला पाहिजे होती. मात्र प्रत्येक पक्षाच्या अहंकारामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. जनतेचा मतदान, लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास यामुळे उडेल.- अश्विनी कदम, संशोधक विद्यार्थिनी, विद्यापीठ
सरकार वेळेत येणे गरजेचेमतदार म्हणून सरकार वेळेत यावे, अशी अपेक्षा आहे. मतदान करून चूक केल्याची भावना आता मनात निर्माण होऊ लागली आहे. सामान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय व्हावेत. शहरातील काही योजना मार्गी लागण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, म्हणून महायुतीच्या सरकारकडून सामान्यांना फार अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांना सध्या तरी सुरूंग लागला आहे. मनोज सोनवणे, फास्ट फूड विक्रेता
वाद चर्चेअंती मिटेल, असे वाटतेसरकार कोणाचे का होईना; परंतु ते लवकर स्थापन झाले पाहिजे. याबाबत प्रत्येक नागरिक विचार करू लागला आहे. ८ तारखेपासून दिवसभर सरकार स्थापनेबाबतचे वृत्त आणि चर्चा सुरूआहे. राज्यातील ओल्या दुष्काळी परिस्थितीची काही माहिती समोर येत नाही. ज्यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी बहुमत आहे. त्यांच्यातील वाद मिटतील आणि सरकार स्थापन होईल, असे वाटते.- किशोर जाधव,सलून व्यावसायिक
राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची घाई केलीराज्यात महायुतीला जनादेश मिळाला होता. शिवसेना आणि भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे सत्तावाटप झाले नाही. यात शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी दिलेला वेळ कमी होता. राष्ट्रवादीचा वेळ संपण्यापूर्वीच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारश राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे केली. हे करण्यात राज्यपालांनी अति घाई केल्याचेच दिसते. - हनुमंत गुट्टे, संशोधक विद्यार्थी, विद्यापीठ
लवकर सरकार स्थापन व्हावेराज्यात लवकर स्थापन व्हावे, असे वाटते आहे. जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी अंतर्गत वाद मिटवून एकत्रित यावे. त्यांच्यातील वाद समन्वयाने मिटावा, अशी अपेक्षा आहे. सरकार स्थापन होत नसल्यामुळे सामान्य जनतेत रोष वाढतो आहे. - मनोज बसय्ये, वडापाव विके्रता
‘जनता समस्यांनी त्रस्त’सारी जनता त्रस्त आहे. बेरोजगारीने डोके वर काढले आहे. नोटाबंदीचा मोठा फटका बसलेला आहे. महागाईने कळस गाठला असून, अशावेळी राज्यात सरकार नाही. सरकार बनायलाच पाहिजे होते. सरकारच नसेल तर प्रश्नांचा डोंगर आणखी वाढेल. जनता आधीच त्रस्त आहे. आता ती आणखी त्रस्त होईल. दुसरे काय? - सुरय्या बेगम, सामाजिक कार्यकर्त्या
राष्ट्रपती राजवट लाजिरवाणी बाबलोकशाही पद्धतीत जनतेने आपला कौल दिलेला आहे. राज्यात राष्टÑपती राजवट लावण्याची वेळ येते ही लाजिरवाणी बाब आहे. एकाही पक्षात धमक नाही का? ते सरकार स्थापन करू शकत नाहीत का? राज्याला निव्वळ मूर्ख बनविण्याचे काम सध्या राजकीय पक्षांकडून सुरू आहे. राष्टÑपती राजवटच लावायची होती तर १९ दिवसांपासून सत्ता स्थापनेचा खेळ का मांडला होता.-मोहंमद इम्रानोद्दीन, पानटपरी चालक
सक्षम सरकार स्थापन करावेराज्याला मध्यावधी निवडणुका आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत. सर्वच राजकीय पक्ष राज्याला मध्यावधीकडे नेत असल्याचे दिसून येत आहे. जनतेने ज्यांना बहुमत दिले त्यांनी सक्षम सरकार स्थापन करावे. विरोधी पक्षांकडे बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी पुढाकार घेऊन सरकार बनवावे. जनतेला अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडू नये.- कलीम खान,हॉटेल व्यावसायिक
‘राष्ट्रपती राजवटच हवी’‘राजकारणात सगळी खिचडी झाली आहे. सगळे पक्ष सत्तेसाठी हपापलेले आहेत. जनतेशी त्यांना काही देणे-घेणे दिसत नाही. शेतकरी आज संकटात आहे; पण त्याची चिंता करायला कुणाजवळ वेळ नाही. महाराष्टÑ पुरोगामी राज्य आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे उठताबसता नाव घेऊन काय उपयोग? आज महाराष्ट्र होत असलेली छी-थू वेळीच थांबवली पाहिजे. त्यासाठी राज्यात भले राष्टÑपती राजवट लागली तरी हरकत नाही’- पी.एस.प्रधान, फुलंब्रीकर, शेतकरी
राज्याचे नाव खराब होतेयमी माझ्या कामात असतो. घरी गेल्यावर टीव्ही पाहतो. तेव्हा थोडेसे लक्षात येते; पण राज्यात सरकार बनवण्यासाठी शरद पवार काही तरी करताहेत वाटते. राजकारणाचा सगळा कचरा झालाय. जनता वाऱ्यावर आणि हे बसले राजकारण खेळत. वाईट वाटते, असे व्हायला नको. महाराष्टÑाचे एवढे मोठे नाव या राजकारण्यांमुळे खराब होतेय. राज्यात राष्टÑपती राजवट लावण्याची वेळ येते ही चिंतेची बाब आहे. राज्यात कोणताच राजकीय पक्ष सरकार स्थापन करीत नाही, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. सर्वच राजकीय पक्षांना सर्व सामान्य नागरिकांची, संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांची अजिबात काळजी नाही, असे दिसते.-अशोक बोर्डे, औरंगपुरा येथील सलूनवाला