वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पैठण शहरातील विविध विकास कामांसाठी रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी १२ कोटी रुपयांचा निधी नगरविकास मंत्रालयातून मंजूर करून आणला होता. ही कामे पैठण न.प.कडे न देता सा. बां.कडे वर्ग करण्यात आली. नगरविकास व सार्वजनिक बांधकाम दोन्ही विभागाची काम करण्याची कार्यप्रणाली भिन्न असल्याने कागदपत्राच्या खेळात ही कामे आता अडकली आहेत. कामांची प्रशासकीय मान्यता घेताना शहर विकास आराखड्यानुसार ही कामे असल्याचे सहसंचालक नगर रचना विभागाचे सुसंगत प्रमाणपत्र जोडावे लागते; मात्र पैठण शहरातील मंजूर विकास कामांची प्रशासकीय मान्यता घेताना सुसंगत प्रमाणपत्र जोडण्यात आले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आल्याने हे प्रमाणपत्र जोडण्याचे आदेश सा.बां.च्या कार्यकारी अभियंत्यांनी काढले आहेत. या आदेशात प्रस्तावित मंजूर कामांचे नगर रचनाचे सुसंगत प्रमाणपत्र पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी प्राप्त करून ते सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पैठण यांना सादर करावे, असे म्हटले आहे. या कामांवरून मात्र भाजपचे नगरसेवक शिवसेनेवर निशाना साधत असून, सत्ता नसल्यानेच ही कामे सा.बां.कडे वर्ग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी मात्र याप्रकरणी मौन बाळगले आहे.
१२ कोटींच्या कामांवरून पैठणमध्ये राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:06 AM