मराठवाड्यातील राजकारणाचा हिंदोळा :  मुक्तीसंग्रामानंतर काँग्रेसच्या बैलजोडीला वाजत-गाजत मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:37 PM2019-04-05T13:37:16+5:302019-04-05T13:43:04+5:30

निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता...

Politics in Marathwada : people gives huge voting to Congress after Marathwada got independent ! | मराठवाड्यातील राजकारणाचा हिंदोळा :  मुक्तीसंग्रामानंतर काँग्रेसच्या बैलजोडीला वाजत-गाजत मतदान !

मराठवाड्यातील राजकारणाचा हिंदोळा :  मुक्तीसंग्रामानंतर काँग्रेसच्या बैलजोडीला वाजत-गाजत मतदान !

googlenewsNext

- प्रा. बी. वाय. कुलकर्णी

मराठवाडा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर, एक वर्ष, एक महिना आणि दोन दिवसानंतर निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाला. मराठवाड्याच्या राजकारणाचा पोत पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भ आणि खानदेशापेक्षा पूर्णत: वेगळा आहे. मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील उपरोक्त निर्देशित भौगोलिक घटकातील मतदार ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. राष्ट्रीय चळवळीतील नेत्याच्या संपर्कात आलेला होता. दुसऱ्या शब्दात राजकीय मानसिक विकासस्पर्श त्यास झालेला होता.  मराठवाड्याच्या बाबतीत याची उणीव होती. रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाले पाहिजे इतकेच सामान्य मतदारास वाटत होते. १७ सप्टेंबर १९४८ ला ते झाले. मराठवाडा मुक्ती लढ्यातील नेत्यापेक्षा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे हे झाले. थोडक्यात काँग्रेसमुळे आपण मुक्त झालो असाच संदेश मराठवाड्यातील कानाकोपऱ्यात गेला. १९५२ च्या निवडणुकीत मराठवाड्यातील जनतेने बैलजोड चिन्हास केलेले मतदान केवळ अभुतपूर्व होते.

मतदानाच्या पूर्वीच काँग्रेसचा उमेदवार निर्वाचित होणार हे जाहीर झाले होते. आणि झालेही तसेच. कोण व्यक्ती उमेदवार आहे यात मतदारांना अजिबात रस नव्हता. मराठवाड्यात तरी झालेले मतदान मुक्त करणाऱ्या पक्षास होते. विरोधी पक्षांनी निवडणुकीत फक्त नोंदणी केली होती इतकेच. प्रचारात बैलजोडीस मतदान झाले. १९५७ आणि १९६२ ची निवडणूक मराठवाड्याच्या बाबतीत गुंतागुंतीची नव्हती, कारण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. मुंबई महाराष्ट्रास मिळाली पाहिजे. यावर चर्चा होत होती. विदर्भ अटीसहित संयुक्त महाराष्ट्रात सामिल होण्याची भाषा करीत होता. मराठवाड्याच्या बाबतीत अशी काही चर्चा नव्हती. निझाम आणि रझाकारी अत्याचार विरहित सर्व चालते या आनंदातच मराठवाड्यातील नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रात सामिल होण्यास होकार दिला. वेगळ्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील नेते मराठवाड्यात त्यांची राजकीय, आर्थिक वसाहत करतील अशी पुसटशी कल्पना ना नेत्यांना आली ना मतदारांना आली. अर्थात यशवंतराव चव्हाण लोकांसमोर होते. त्यावेळी मराठवाडा साप्ताहिक होते. मराठवाड्याची राजकीय मानसिकता त्यातून व्यक्त होत होती. औरंगाबाद आणि नांदेड तेव्हा राजकीय मतनिर्मितीची केंद्रे होती. असे असताना देखील, मराठवाडा मुक्ती आंदोलनातील प्रमुख नेतृत्व आ. गोविंदभाई श्राफ यांचा पराभव करत काँग्रेसचे रफिक झकेरिया विजयी झाले होते. काँग्रेसची पकड कायम होती. औरंगाबाद नांदेड वगळता परभणी, बीड,उस्मानाबाद जिल्ह्यात चिन्ह च काँग्रेसला यशस्वी करीत होते. फक्त परभणीत शेतकरी कामगार पक्ष प्रभावी होता.

1967 पर्यंत मराठवाड्यात काँग्रेसला यश मिळत होते. याचे कारण प्रत्येक खेड्यातील माणूस हा काँग्रेसचा होता. तो प्रतिष्ठित होता. भरपूर शेतीचा मालक होता. तो चांगला होता; पण तितकेच उपद्रवमूल्य त्यात होते. अडले नडलेले काम त्याच्याकडूनच होत होते. तो म्हणेल त्यालाच मतदान होत होते. काँग्रेसच्या यशात हा भाग मोठा होता. याव्यतिरिक्त औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, परभणी, बीड, मानवत याठिकाणी काँग्रेसच्या यशाचे श्रेय मोंढा पॉलिटिक्सला दिले जाते. 

चेहरा शेतकऱ्याचा, कामे व्यापाऱ्यांची 
राजकीय नेत्याचा चेहरा शेतकऱ्याच्या मुलाचा, मात्र तो कामे करणार फक्त व्यापाऱ्यांचे अशा पद्धतीने खेडेगावात न प्रचार करता काँग्रेसचे नेते निर्वाचित होत असत. थोडक्यात १९६७ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मराठवाड्यात, सुरुवातीला मुक्तीच्या आनंदात मतदान झाले तर नंतर मोंढा पॉलिटिक्कसचा वरचष्मा राहिला. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा होता. व्यक्तीच्या कामापेक्षा त्याचे चिन्ह मोठे होते.

Web Title: Politics in Marathwada : people gives huge voting to Congress after Marathwada got independent !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.