प्रदूषण नियंत्रण मंडळ पथकाची घाटी रुग्णालयात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 08:01 PM2018-12-20T20:01:17+5:302018-12-20T20:03:08+5:30
‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी घाटीत पाहणी केली.
औरंगाबाद : घाटीत मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट साठविल्याने मोकाट कुत्र्यांच्या तोंडी मानवी मांसाचे गोळे लागत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी घाटीत पाहणी केली. बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण आणि साठवणुकीतील त्रुटींसंदर्भात दोन दिवसांत उत्तर देण्याची सूचना घाटी प्रशासनाला करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश औटी यांनी मूत्रपिंड विकार विभागाच्या शेजारी साठविण्यात येणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची स्थिती पाहिली. याबरोबरच मेडिसिन विभागाच्या इमारतीसमोरील जुन्या वार्ड क्रमांक ८-९च्या पाठीमागे खड्डे करून कचरा पुरण्यात येणाऱ्या जागेचीही पाहणी केली.
यावेळी वॉटरग्रेस कंपनीचे अधिकारी वैभव बोरा, निवासी वैद्यकीय अधिकारी विकास राठोड उपस्थित होते. या दोन्ही जागेत बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण, साठवणूक आणि विल्हेवाट योग्यरीत्या होत नसल्याचे निदर्शनास आले. बॉडी पार्ट असलेल्या पिशव्या उघड्यावरच ठेवल्या जातात. परिणामी तेथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत आहे. त्यातूनच मांसाचे गोळे घेऊन कुत्रे घाटी परिसरात फिरल्याचे समोर आले. या सगळ्यांची नोंद घेण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दंडुक्यानंतर आता घाटीने कचरा वर्गीकरणासंदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे.
घाटीत तिसऱ्यांदा पाहणी
बायोमेडिकल वेस्टसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिसऱ्यांदा पाहणी केली आहे. घाटीत २०१६ पासून त्रुटी दूर झालेल्या नाहीत. उघड्यावर कचरा संकलन आणि एसटीपी प्लांट नाही, या मुख्य त्रुटी आहेत. परिणामी परिचारिका, कर्मचारी, डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक या सर्वांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
दोघांना नोटीस बजावणार
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घाटीत पाहणी केली. घाटीसह नियमित कचरा उचलण्यासाठी वॉटरग्रेस कंपनीला नोटीस बजावली जाईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी
सांगितले.
योग्य विल्हेवाटीसाठी प्रयत्न
प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजन बिंदू यांनी पाहणीसाठी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. घाटीतील वॉर्डांमध्ये कचऱ्याचे योग्यरीत्या वर्गीकरण होईल, यासाठी प्राधान्य दिले जाईल. कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी प्रयत्न केले जातील, तसेच कचरा साठवणुकीसाठी अन्य जागा पाहिली जाईल. कर्मचाऱ्यांना कचरा वर्गीकरणासंदर्भात प्रशिक्षण दिले जाईल, असे डॉ. बिंदू यांनी सांगितले.