तरुणाने मंडळाच्या पथकात रात्री उशिरापर्यंत ढोलचा सराव केला; घरी परतल्यानंतर घेतला गळफास
By राम शिनगारे | Published: September 1, 2022 07:42 PM2022-09-01T19:42:13+5:302022-09-01T19:45:23+5:30
१८ वर्षांच्या युवकाने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही
औरंगाबाद : हर्सूल परिसरातील गणेश मंडळाच्या ढोल पथकात रात्री उशिरापर्यंत सराव केल्यानंतर घरी आलेल्या १८ वर्षांच्या युवकाने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुमीत गौतम कोतकर (१८, रा. देहाडेनगर, अंबरहिल जटवाडा रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. सुमीत हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याला तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्याचे वडिल मातीकाम तर आई हॉटेलमध्ये कामाला आहे. सुमीत परिसरातील गणेश मंडळात ढोल वाजविण्याचा सराव करण्यासाठी बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. तेथून रात्री परत आल्यानंतर त्याने घरातील पत्र्याच्या छताला लावलेल्या पंख्याला ११ वाजेच्या सुमारास गळफास घेतला.
कुटुंबातील सदस्यांना दिसताच खाली उतरवुन घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी पहाटे मृत घोषीत केले. सुमीतने आत्महत्या कशामुळे केली, याचा उलगडा गुरुवारी रात्रीपर्यंत झाला नाही. त्याच्यावर हर्सूल परिसरात गुरुवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आई, वडिल आणि एक भाऊ असा परिवार आहे.
पाच वर्षांपूर्वी बहिणीची आत्महत्या
सुमीत याने १७ व्या वर्षी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असतानाच त्याच्या मोठ्या बहिणीनेही पाच वर्षांपूर्वी १७ वर्षांची असताना जाळून घेत आत्महत्या केली होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. १७ ते १८ या वयातच बहिणी-भावाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.