देवगाव रंगारी (जि. औरंगाबाद) : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून पैसे आणले नाहीत, म्हणून सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याने गर्भवती सुनेचा मृत्यू झाला. ही घटना कन्नड तालुक्यातील देभेगाव येथे शुक्रवारी घडली. पोलिसांनी याप्रकरणी सासरकडील ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून मयत विवाहितेच्या पतीस अटक केली आहे.सीमा सद्दाम शेख (१९), असे या मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. हर्सूल सावंगी येथील सीमाचा विवाह देभेगाव येथील सद्दाम पाशू शेख दगडू याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या एक दिवस अगोदर सासरच्या मंडळींनी मोटारसायकलची मागणी केली होती. लग्नानंतर पुन्हा ट्रॅक्टर घेण्यासाठी पैशाची मागणी केली. यादरम्यान, सीमाच्या आईने दोन वेळा सासरच्या मंडळींना ५०-५० हजार रुपये दिले होते. एवढे पैसे देऊनही आणखी पैशासाठी सीमाचा छळ वाढू लागला.बनाव अंगलट२४ एप्रिल रोजी सद्दाम पाशू शेख याने सीमाच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीच्या पोटात दुखत असून, तिला घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. यावर सीमाचे आई-वडील तातडीने घाटीत गेले असता तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या. सीमा शुद्धीवर आल्यानंतर तिने सर्व हकिकत आई-वडिलांना सांगितली. पैशासाठी मला सर्वांनी बेदम मारहाण केली व गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे माझे हे हाल झाले आहेत, असे सीमाने सांगितल्याने सासरच्या मंडळींचा बनाव उघड झाला. २६ एप्रिल रोजी उपचार सुरू असताना सीमाचा मृत्यू झाला. यानंतर मयत सीमाची आई मुन्नीबी शमीम सय्यद (रा. हर्सूल सावंगी) यांनी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सीमाचा पती सद्दाम पाशू शेख, सासू समिना शेख, सासरा पाशू दगडू शेख, दीर सलमान पाशू शेख, नणंद समरीन शेख यांच्या विरोधात गुन्हा केला. यातील सद्दामला अटक करण्यात आली असून स.पो.नि. स्वप्ना शहापूरकर पुढील तपास करीत आहेत.
पैशासाठी गर्भवती सुनेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:11 AM