विद्यार्थ्याच्या आईच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 08:08 PM2021-03-04T20:08:46+5:302021-03-04T20:10:00+5:30
अनवी (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
औरंगाबाद: तक्रारदार यांच्या मुलाच्या आईच्या नावात भिकुबाई ऐवजी द्वारकाबाई अशी दुरुस्ती करण्यासाठी आणि बोनाफाईड देण्याकरिता साडेतीन हजार रुपये लाच घेतांना अनवी (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी आरोपी मुख्याध्यापकाच्या शाळेत करण्यात आली.
संजय मुरलीधर वाघमारे(४६) असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांचा मुलगा अनवी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. त्याच्या शाळेतील नोंदीनुसार आईच्या नावात भिकुबाई ऐवजी द्वारकाबाई अशी दुरुस्ती करण्यासाठी आणि मुलाचे बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज केला होता. बोनाफाईड आणि आईच्या नावातील दुरूस्ती करण्यासाठी तक्रारदार यांनी आरोपी मुख्याध्यापक वाघमारेची भेट घेतली तेव्हा त्याने या कामासाठी ४ हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वाघमारेची तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ जमादार, उप अधीक्षक बी व्ही गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर, हवालदार रवींद्र आंबेकर, अरुण उगले, भूषण देसाई आणि चालक बागुल यांच्या पथकाने दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली.
यावेळी वाघमारेने तडजोड करीत साडेतीन हजार रुपये लाच आणून देण्यास सांगितले. यानुसार आज ए सी बी च्या अधिकाऱ्यांनी अन्वी येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत तक्रारदार यांच्याकडून साडेतीन हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लाचेच्या रकमेसह वाघमारेला रंगेहाथ पकडले. याविषयी आरोपी मुख्याध्यापकाविरूध्द सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.