पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य मिलिंद देशपांडे यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप्लिकेशन डाऊनलोड होत नव्हते. यामुळे त्यांनी गुगलवर आरोग्य सेतूच्या कस्टमर केअरचा नंबरचा शोध घेतला. गुगलवर मिळालेल्या नंबरवर संपर्क केल्यानंतर संबंधित सायबर भामट्याने त्यांना एनी डेस्क हा अॅप इन्स्टॉल करण्यास लावला. एनी डेस्क हा सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यांनी संबंधित इन्स्टॉल नंबर घेऊन, केवायसी करण्याच्या नावाखाली मोबाईल वरील पेटीएमवरून दहा रुपये पाठविण्याचे सांगितले. देशपांडे यांच्या मोबाईलचा ताबा घेत भामट्याने त्यांच्या खात्यावरून तीन टप्प्यांत ९६ हजार रुपये परस्पर उत्तर प्रदेशातील एका खात्यावर वळती करून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, देशपांडे यांनी पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना त्यांनी सर्व माहिती सादर केली. या माहितीवरून पोलीस अंमलदार प्रशांत साकला आणि सुशांत शेळके यांनी मिलिंद देशपांडे यांच्या खात्यावरून गेलेल्या रकमेचा शोध घेऊन रक्कम गोठविली.