- संजय जाधव
पैठण (औरंगाबाद ) : राज्यभरातील कारागृहांची अन्नधान्य व भाजीपाल्याची गरज पैठण येथील खुले कारागृहातून भागविली जात आहे. सध्या कारागृहातील गुऱ्हाळातून कैदी केमिकलविरहीत हायजेनिक गुळाची निर्मिती करत असून निर्माण झालेला गूळ पैठण कारागृहाची गरज भागविल्यानंतर राज्यातील इतर कारागृहांना पाठविण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांनी सांगितले. पैठण कारागृहाकडे जायकवाडी धरणाच्या परिसरात ३०० एकर जमीन असून कैदी या जमिनीतून अन्नधान्य, भाजीपाला, ऊस असे उत्पादन घेऊन कारागृहाच्या उत्पन्नात भर टाकत आले आहेत.
पैठण येथील खुल्या कारागृहात जानेवारीपासून कैद्यांनी गुऱ्हाळ सुरू केले असून १५ टन गुळाची निर्मिती करण्यात आली आहे. पाच लाख ३० हजार रुपये खर्चून कारागृहात हायजेनीक गुऱ्हाळ यंत्रणा उभारण्यात आली आहे. दररोज सरासरी २५ टन कारागृहातील उसाचे गाळप करण्यात येत आहे. निर्माण झालेला गूळ राज्यभरातील कारागृहात पाठविला जाणार आहे. कारागृहांना पाठवून गूळ उरला तर तो निर्यात करण्याचा कारागृह प्रशासनाचा मानस असल्याचे साळवे यांनी सांगितले.
३०० एकर जमिनीत कैद्यांचे मनुष्यबळ वापरून शेती उत्पादन घेतले जाते. विविध भाजीपाला पिके व उसाची लागवड कारागृहातील जमिनीत केली जाते. कारागृह उत्पादनाच्या बाबतीत पैठण येथील कारागृहाने देशपातळीवर व राज्यपातळीवर नेहमी क्रमांक पटकावला आहे. जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेले कारागृहातील गुऱ्हाळ यंदा कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांच्या पाठपुराव्यातून पुन्हा सुरू झाले आहे.
कोल्हापूर पध्दतीची यंत्रणा ५ लाख ३० हजार रुपयांचा विशेष निधी यासाठी राज्य शासनाने मंजूर केला. कोल्हापूर पध्दतीची गुऱ्हाळ यंत्रणा कारागृहात उभी करण्यात आली आहे. आतापर्यंत कारागृह प्रशासनाने साखर कारखान्यांना ऊस देऊन उत्पादन मिळविले आहे. गुऱ्हाळाबाबतची तांत्रिक माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २ वेळेस कोल्हापूर येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. यानंतर स्वयचलीत यंत्रणा असलेल्या या गुऱ्हाळाचे बांधकाम कोल्हापूर येथील तज्ज्ञांनी केले आहे. या गुऱ्हाळ यंत्रणेची रोजची क्षमता २५ टन आहे. सध्या सरासरी १२ टन ऊसाचे गाळप करून हळूहळू गाळप वाढविण्यात येणार असल्याचे साळवे यांनी सांगितले.
३५ एकर ऊस उभा कारागृह प्रशासनाच्या ताब्यातील शेतात सध्या ३५ एकर ऊस उभा असून जवळपास ६५ एकर क्षेत्रात ऊस लागवड झाली आहे.
धरणाच्या कामासाठी कैद्यांचे मनुष्यबळ वापरता यावे म्हणून कारागृहाची निर्मितीखुल्या कारागृहातील कैद्यांचे सिंचन प्रकल्पांच्या कामात मनुष्यबळ वापरण्याच्या कल्पनेतून पैठण येथील जायकवाडी धरणाच्या कामासाठी कैद्यांचा वापर करता येईल, या उद्देशाने पैठण येथे खुले जिल्हा कारागृह उभारण्यात आले. जायकवाडी प्रकल्पाच्या बांधकामावर १९६७ -६८ पासून त्यांना काम देण्यात आले. धरणाचे काम पूर्ण होईपर्यंत कैद्यांनी धरणाचे काम केले. त्यानंतर धरणासाठी संपादित केलेले, परंतु वापरण्यात न आलेले मोठे क्षेत्र परिसरात होते. ही जमीन कारागृहास वर्ग करून कैद्यांकडून शेती उत्पन्न घेतले जाऊ लागले. अनेक कैद्यांनी या शेतीत आपले कसब ओतून शेती फुलविली आहे.
धरण निर्मितीनंतर कैद्यांनी केली शेतीधरण उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर दक्षिण जायकवाडी या भागतील ३५० एकर संपादित जमीन कारागृहास वर्ग करून शेती व्यवसायाला सुरुवात झाली. कैद्यांना मजुरी देऊन शेती कामाला लावण्यात आले. आज या शेतीने कोट्यवधी रुपयांचा महसूल राज्य सरकारला दिला आहे. या शेतीतून यंदा गहू, बाजरी, ऊस, अन्नधान्य, धान्य, सोयाबीन, आंबा, कोथंबीर,कढीपत्ता, करडी भाजी, मेथी, शेपू, पत्ताकोबी, दुधी भोपळा, मुळा, भेंडी, कांदा, गाजर, गवार, डांगर, बटाटे, शेवगा, वांगे, हिरवी मिरची, टमाटे, चवळी शेंग, चिंच आदी उत्पादन घेतले आहे. तसेच ऊस चारा वैरण, शेणखत व दूध यातूनही उत्पन काढले जात आहे.
यंदा ३ कोटी ८६ लाखांचे उत्पन्नराज्यातील कारागृहाच्या शेतीतून २०१७ -२०१८ या वर्षात ३ कोटी ८६ लक्ष रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात पैठण ८४ लाख ५० हजार, विसापूर ६१.३७ लाख, नाशिक ४०.३३ लाख, उस्मानाबाद ४.३४ लाख, बुलढाणा ३.५९ लाख, परभणी २.८० लाख, येरवडा ३६.२४ लाख, कोल्हापूर ८.५३ लाख असे उत्पन्न मिळाले आहे.
जीवन जगण्याचा धडा कारागृहातखुल्या कारागृहातील कैद्यांना तुरुंगाच्या भिंतींचे बंधन नसल्यामुळे, वसतिगृहात राहिल्याप्रमाणे ते राहतात. कारागृहात कैदी असलेला व्यक्तीस मानसिक व सामाजिक संस्कार देऊन एक चांगली व्यक्ती म्हणून ती बाहेर पडेल, याची काळजी घेतली जाते. त्यांना कामाचा मोबदलाही दिला जातो व त्यातून ते आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवू शकतात. त्यांना पळून जावेसे वाटत नाही; कारण आपले हित कशात आहे, याची सुजाण जाणीव त्यांना झालेली असते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर जीवन जगण्याचा धडा या कैद्यांना कारागृहात मिळतो.-सचिन साळवे, कारागृह अधीक्षक