‘औरंगाबाद : कमी गुणवत्तेचीच मुले ‘आयटीआय’ करतात, ही भावना आता बदलत्या औद्योगिकरणामध्ये लुप्त होत चालली आहे. केवळ औरंगाबादच नव्हे तर पुणे औद्योगिक परिसरातील खाजगी कंपन्याही आता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) जाऊन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नोकरीची संधी देत आहेत. ८ जुलैपासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आज दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा आॅनलाईन प्रवेश घेण्यासाठी चांगला प्रतिसाद होता. सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी ‘एआरसी’ (अॅप्लिकेशन रिसिव्ह सेंटर) उभारण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एआरसीच्या ठिकाणी आॅनलाईन प्रवेश घेण्याची सुविधा झाली आहे. खाजगी कंपन्यांना ‘आयटीआय’च्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक खाजगी कंपन्या आयटीआयमध्ये जाऊन परिसर मुलाखती घेत आहेत. यामध्ये ‘कॉम्प्युटर आॅपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट’, ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स’, ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स’, ‘इलेक्ट्रीशियन’, ‘मेकॅनिक डिझेल’, ‘मेकॅनिकल आॅटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स’ या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना खाजगी कंपन्याकडून जास्त मागणी आहे. सुरुवातीला परिसर मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर त्यांना कंपनीत ट्रेनी अथवा अॅप्रेन्टीशिप म्हणून नोकरी मिळते. काही दिवस त्या विद्यार्थ्यांच्या कामाची गुणवत्ता बघितली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुशलतेनुसार त्याला चांगल्या पगाराची नोकरी दिली जाते. औरंगाबादेत २०० जागा वाढल्याकंपन्यांचा कल बघून आयटीआयमधील ट्रेडही बदलले आहेत. अलीकडे सिव्हील, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा औरंगाबादेतील मुलांच्या ‘आयटीआय’मध्ये २०० जागा वाढल्या आहेत.विभागातील ८ जिल्ह्यांत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या ८२ आहे. या ८२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ८ वी व १० वी उत्तीर्ण १६ हजार १६२ विद्यार्थ्यांना विविध ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते.औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ११ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत असून त्यात १२१६ विद्यार्थ्यांना २७ ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते.
आयटीआय’चे दरवाजे ठोठावतात खाजगी कंपन्या
By admin | Published: July 11, 2014 12:51 AM