नव्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:15 PM2019-04-12T23:15:32+5:302019-04-12T23:15:56+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ दीड महिनाच राहिला आहे. ४ ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ दीड महिनाच राहिला आहे. ४ जून रोजी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणे अपेक्षित आहे. नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या समितीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली असून, येत्या आठवड्यात पदासाठी अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची ३ जून २०१४ रोजी निवड झाली होती. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या दीड महिन्यानंतर संपणार आहे. नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी कुलपती तथा राज्यपालांनी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून प्रशासनाने दिल्ली आयआयटीतील प्रा. प्रवीण कुमार यांची निवड केली होती. त्यानंतर राज्य शासनाने प्रधान सचिव भूषण गगराणी यांचा समावेश समितीत केला. राज्यपाल कार्यालयाने सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती अनिल दवे यांची निवड केली होती. समितीच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दवे यांनाच नेमले आहे. या समिती सदस्यांची पहिली बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत पार पडली आहे. पहिल्यांदाच भेटलेल्या समिती सदस्यांनी कुलगुरू निवड समितीचे कामकाज कसे चालणार याविषयी प्राथमिक चर्चा केली. विद्यापीठातर्फे या समितीसाठी लायझनिंग आॅफिसर म्हणून उपकुलसचिव दिलीप भरड यांनाही पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या समितीच्या बैठकीत नोडल अधिकारी नेमणे, अर्ज मागविणे, त्यासाठी जाहिरातीचा मसुदा ठरविणे, कोणत्या माध्यमात जाहिरात प्रसिद्ध करायची? याविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. समितीचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी पहिल्यांदा नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात कुलगुरूपद भरण्यासाठी जाहिरात देण्यात येईल, असेही ठरविण्यात आल्याची माहिती आहे. विद्यमान कुलगुरूंचा कालावधी अल्प राहिला असल्यामुळे निवडीची प्रक्रिया दीड महिन्यात पूर्ण करावी लागणार आहे. त्यादृष्टीने समिती प्रयत्न करीत असल्याचेही समजते.
--------------