जुलूस-ए-मोहम्मदीत उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:21 AM2017-12-03T01:21:04+5:302017-12-03T01:21:38+5:30
प्रेषित हजरत मोहम्मद सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी सकाळी निझामोद्दीन चौक येथून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. मागील २४ वर्षांमध्ये या मिरवणुकीत कोणताही खंड पडलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रेषित हजरत मोहम्मद सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी सकाळी निझामोद्दीन चौक येथून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. मागील २४ वर्षांमध्ये या मिरवणुकीत कोणताही खंड पडलेला नाही. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ध्वजारोहण, पुष्पवृष्टीने औरंगाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ ही मिरवणूक शहरात फिरत होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मिरवणुकीत अभूतपूर्व असा उत्साह पाहण्यास मिळाला.
प्रेषितांचा जन्मदिन म्हणजे उर्दू तारखेनुसार १२ रब्बील अव्वल. या दिनाची मागील काही दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पाहण्यात येत होती. शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पंधरा दिवसांपासून जोरदार तयारीही सुरू होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई, प्रत्येक चौकात मोठमोठे दिवे, झेंडे लावून चांगलीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी ९ वाजेपासून निझामोद्दीन चौकात हळूहळू गर्दी वाढत होती. पोलीस आयुक्त यशस्वी यादव, ईद-ए-मिलादुन्नबी संयोजन समितीचे निमंत्रक डॉ. शेख मुर्तुझा, माजी महापौर रशीद खान मामू यांच्यासह संयोजन समितीचे सर्व पदाधिकाºयांच्या उपस्थितीत जुलूस-ए-मोहम्मदीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी घोडे, त्यावर लहान-लहान मुले पारंपरिक वेशभूषेत झेंडे घेऊन बसले होते. शहागंज चमन, राजाबाजार, नवाबपुरा, जिन्सी, जिन्सी चौक, कैसर कॉलनी, चंपाचौक, शहाबाजार, मंजूरपुरा, लोटाकारंजा, बुढीलाईन, जुनाबाजार, सिटीचौक, सराफा, गांधी पुतळामार्गे परत हजरत निझामोद्दीन चौक येथे मिरवणूक पोहोचली.
मिरवणूक परत आल्यानंतर ध्वजारोहण करण्यात येऊन ‘सलाम’ पढण्यात आले. दर्गा हजरत बनेमियाँ रह. येथे स्वागत समारंभ ठेवण्यात आला होता. जिन्सी चौक, मंजूरपुरा, बुढीलेन, नई बस्ती आदी भागांत मिरवणुकीचे उत्साहात तरुणाईने स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहणही डॉ. मुर्तुझा यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीत पवित्र काबाची प्रतिकृतीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
मोहंमद असदउल्ला खान तर्रार, मौलाना हिदायत उल्ला खान तर्रार, अॅड. ख्वाजा जियाउद्दीन खान बियाबाणी, युनूस रझवी, काझी आरेफोद्दीन, हमीद उल्ला खान, सय्यद मजहर शुत्तारी, काझी शकील अहेमद, शेख मुकरम बागवाला, सोहेल मुर्तुझा, कलीम उल्ला खान, सय्यद आसिफ अली आदींची उपस्थिती होती.