प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्रीचे रॅकेट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 06:39 AM2021-06-14T06:39:00+5:302021-06-14T06:39:09+5:30
गुजरात, आंध्र प्रदेशातून येतेय बियाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उत्पादन, विक्री, पेरणी करण्यास बंदी असलेल्या एचटीबीटी (हर्बिसाइड-टोलरेंट बीटी) कापूस बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असून, कृषी विभागाची यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसून येत आहे. गुजरात, आंध्र प्रदेशातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या या बियाणांच्या खरेदीतून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. मराठवाड्यातील सर्वाधिक सुमारे चार लाख हेक्टरवर औरंगाबाद जिल्ह्यात कापूस लागवड होत असून, एचटीबीटीच्या अनधिकृत बियाण्यांची अवैध विक्री होत असल्याने अधिकृत बियाणे विक्रेत्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रच्या सीमेवरील जिल्ह्यात एचटीबीटी बियाण्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अधिकृत कपाशी बियाणे विक्रीवर परिणाम होत आहे. नुकतेच कृषी विभागाने एचटीबीटीचे २५ बियाण्यांचे पॅकेट जप्त केले. दरम्यान विक्रेता पसार होण्यात यशस्वी झाला. तो गुजरातच्या कृषी उत्पादक कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे समोर आले. बहुतांश साठा गुजरात, उत्तर प्रदेशस्थित कंपन्यांचा आहे.
परवानगी दिली, तर काळेबेरे समोर येईल
कापसाचे व्यापारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी हे थेट शेतकऱ्यांच्या संपर्कातील असतात. ते एचटीबीटी बियाणाला परवानगी दिली, तर त्यातील काळेबेरे समोर येईल.
- जगन्नाथ काळे,
अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर सीड्स पेस्टिसाइड्स डीलर्स असोसिएशन