पथनाट्यातून स्वच्छ भारत मिशनची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:33 PM2017-09-03T23:33:34+5:302017-09-03T23:33:34+5:30
शहर पाणंदमुक्त करण्यासाठी बीड शहराच्या पेठबीड भागातील राष्ट्रीय गणेश मंडळाने कंबर कसली आहे. पथनाट्याच्या माध्यमातून पाणंदमुक्ती संदर्भात जनजागृती केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहर पाणंदमुक्त करण्यासाठी बीड शहराच्या पेठबीड भागातील राष्ट्रीय गणेश मंडळाने कंबर कसली आहे. पथनाट्याच्या माध्यमातून पाणंदमुक्ती संदर्भात जनजागृती केली जात आहे. आतापर्यंत २५ सार्वजनिक ठिकाणी हे कार्यक्रम झाले आहेत. इतर विषयांनाही पथनाट्याद्वारे हात घातला आहे. शहरातील असा हा एकमेव उपक्रम आहे.
राष्ट्रीय गणेश मंडळाच्या वतीने नेहमी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. यावर्षी अध्यक्ष आदित्य सारडा व माजी उपनगराध्यक्ष अमृत सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्यातून शहर पाणंदमुक्त करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच बेटी बचाव-बेटी पढाव, स्त्रीभ्रूणहत्या, पाणी अडवा-पाणी जिरवा यासारख्या विषयांवरही प्रकाश टाकला जात आहे. तब्बल ९ तरुण हे पथनाट्य सादर करतात. उपस्थितांची दाद मिळविण्यासोबतच आदर्श उपक्रमाचा संदेश समाजात पोहोचवीत आहेत.
विविध स्पर्धा
राष्ट्रीय गणेश मंडळाच्या वतीने लिंबू-चमचा, स्लो सायकल स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, गीत गायन, एक मिनीट स्पर्धा, रांगोळी, फॅन्सी ड्रेस व संगीत खुर्ची घेतल्या जात आहेत. यामुळे कलागुणांना वाव मिळत आहे.
उपस्थितांकडून अभिप्राय
जनजागृती केल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांकडून एका कागदावर त्यांचे अभिप्राय नोंदविले जातात. त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनांवर अंमलबजावणी होत असल्याचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले.