Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:18 PM2019-02-16T13:18:54+5:302019-02-16T13:23:01+5:30
यावेळी नागरिकांनी दिलेल्या 'अमर रहे' , 'अमर रहे', 'शहीद जवान अमर रहे' च्या जयघोषाने विमानतळ परिसर दणाणून गेला.
औरंगाबाद: जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नितीन शिवाजी राठोड आणि संजय भिकमसिंह राजपूत यांचे पार्थिव आज हवाई दलाच्या विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी 'सीआरपीएफ'तर्फे त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी दिलेल्या 'अमर रहे' , 'अमर रहे','शहीद जवान अमर रहे' च्या जयघोषाने विमानतळ परिसर दणाणून गेला.
चोरपांघरा( ता. लोणार, जि. बुलढाणा) येथील नितीन शिवाजी राठोड आणि मलकापूर ( जि. बुलढाणा) येथील संजय भिकमसिंह राजपूत हे बुलढाणा जिल्ह्यातील जवान पुलवामा येथील जयघोषात शहीद झाले. या दोन्ही जवानांचे पार्थिव विमानाने सकाळी औरंगाबादेत आणण्यात आले. त्यांना सलामी देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी विमानतळाच्या परिसरात गर्दी केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'पाकिस्तान मुर्दाबाद, 'अमर रहे' , 'अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सलामी वाहिल्यानंतर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले.
LIVE - पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे पार्थिव त्यांच्या गावांकडे रवाना https://t.co/FQBqj3jqlT
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 16, 2019
यावेळी पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खा. चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा जिल्हाधिकारी उदय चौधरी, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, यांच्यासह नागरिकांनी सलामी दिली.