प्रफुल्ल जटाळे यांनी पटकावला आयर्न मॅनचा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:11 AM2019-02-22T01:11:28+5:302019-02-22T01:11:55+5:30
औरंगाबादचे अनुभवी सायकलपटू व मॅरेथॉनमधील धावपटू डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी नुकताच आयर्न मॅन किताब पटकावला. अशी कामगिरी करणारे ते मराठवाड्यातील पहिले सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर ठरले. ही कामगिरी त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादचे अनुभवी सायकलपटू व मॅरेथॉनमधील धावपटू डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी नुकताच आयर्न मॅन किताब पटकावला. अशी कामगिरी करणारे ते मराठवाड्यातील पहिले सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर ठरले.
ही कामगिरी त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत केली आहे. आयर्न मॅन किताब पटकाविण्यासाठी खेळाडूंला ३.८ कि.मी. स्विमिंग, १८0.२ कि. मी.सायकलिंग आणि ४२.२ कि. मी. धावावे लागते.
हे सर्व एकाच वेळी न थकता १७ तासांत पूर्ण करावे लागतात. तथापि, प्रफुल्ल जटाळे यांनी हे तिन्ही प्रकार १६ तास आणि ३0 मिनिटांत पूर्ण करून आयर्न मॅन किताबावर शिक्कामोर्तब केले.
यासाठी त्यांनी ५ महिन्यांपासून तयारी केली होती. दररोज पहाटे १ तास रनिंग, एक तास सायकलिंग आणि सायंकाळी स्विमिंगचा सराव त्यांनी केला. ते मॅरेथॉनमधीलही चांगले धावपटू आहेत. २0१५ पासून ते मॅरेथॉनमध्ये सातत्याने सहभागी होत आहेत. त्यांनी लोकमत महामॅरेथॉनमध्ये दिशादर्शक म्हणूनही यशस्वीपणे कामगिरी केली आहे. २00, ३00, ४00 आणि ६00 कि.मी. बीआरएम स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी ‘सुपर रँडॉननेर’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणारे ते मराठवाड्यातील पहिले डॉक्टर आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी डेक्कन क्लिफहंगेर (रेस अक्रॉस अमेरिका क्वॉलिफायर) पुणे ते गोवा, असे अंतर पूर्ण करून त्यांनी विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे त्यांनी २0१५ मध्ये न्युक्लिअर मेडिसनच्या परिषदेत ‘बेस्ट रीसर्च पेपर’ हा पुरस्कार पटकावला आहे, तसेच दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्या हस्ते त्यांना बेस्ट न्युक्लिअर मेडिसनतज्ज्ञ इन वेस्ट इंडिया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल डॉ. उन्मेश टाकळकर, डॉ. अजय रोटे, तसेच क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.