‘पूर्णा’त दांडेगावकरांना जाधवांनी झुंजविले
By Admin | Published: June 21, 2017 11:31 PM2017-06-21T23:31:06+5:302017-06-21T23:32:20+5:30
वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या अटीतटीच्या लढतीत माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पॅनलने २१ पैकी १६ जागा तर भाजपनेते अॅड. शिवाजी जाधव यांच्या पॅनलनेही पाच जागा मिळवत जोरदार टक्कर दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या अटीतटीच्या लढतीत माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पॅनलने २१ पैकी १६ जागा तर भाजपनेते अॅड. शिवाजी जाधव यांच्या पॅनलनेही पाच जागा मिळवत जोरदार टक्कर दिली. मतमोजणीत दर बुथ गणिक मतांचे पारडे खाली वर होत असल्याने प्रचंड उत्कंठा ताणली होती. शिवसेनेचे माजीमंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या पॅनलची अवस्था मात्र केविलवाणी झाल्याचेही चित्र समोर आले.
पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीचा अंतिम निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होती. ती बुधवारी दुपारी १ वाजता संपली. तब्बल ३० तास ही प्रक्रिया चालली. मोजणीच्या पहिल्या फेरीत जयप्रकाश दांडेगावकरांच्या सर्व पॅनलला आघाडी होती. दुसऱ्या फेरीत मात्र आघाडी घटली आणि अॅड. शिवाजी जाधव यांचे पॅनलने मुसंडी मारली. तिसऱ्या फेरीत पुन्हा दांडेगावकरांच्या पॅनलला चांगली मते मिळाली. आघाडीतील चढ-उतार व कोणाला किती मते मिळाली, हे रात्रभर स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे निकालाचीच अनिश्चितता दिसत होती. कधी दांडेगावकरांचे पॅनल समोर तर कधी अॅड. जाधव यांचे पॅनल. उमेदवारांची आघाडी असे काट्याच्या लढतीचे चित्र होते.
शेवटी सकाळी तिसऱ्या फेरीची आकडेवारी समोर आली. यात अॅड.शिवाजी जाधव यांच्यासह त्यांच्या पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होण्यापूर्वी पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. निकालाअंती पूर्णा कारखान्यावर माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकरांची सत्ता कायम राहिल्याचे स्पष्ट झाले. तर तालुक्याच्या राजकारणात तिसरी शक्ती म्हणून पुढे येणाऱ्या अॅड. शिवाजी जाधव यांनाही पाच जागा सभासदांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर पूर्णा निवडणुकीत शिवसेनेच्या आ. जयप्रकाश मुंदडा यांना पुन्हा एकदा जबरदस्त पराभव पहावा लागला. विधानसभेप्रमाणे दोघांच्या भांडणात लाभ होईल, अशी अपेक्षा असताना पॅनलमधील उमेदवारांना अत्यल्प मते मिळाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. एकाही उमेदवाराला हजाराचा आकडा गाठता आला नाही. महिला गटातील उज्ज्वला तांभाळे यांना सर्वाधिक ८१७ मते आहेत. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना ७५४ तर सभापती अंकुश आहेर यांना ७५१ मतांवर समाधान मानावे लागले.
जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पॅनलमधील विजयी १६ उमेदवार व मते पुढीलप्रमाणे- ऊस उत्पादक मतदारसंघ- जयप्रकाश दांडेगावकर (८४७१), चंद्रकांत नवघरे (८५८९), कमलकिशोर कदम (८८३६), शहाजी देसाई (८७५४), गजानन धवन (८४६३), मनोहर भालेराव (८६४२), दत्तराव चव्हाण (८५९४), विश्वनाथ चव्हाण (८५४४), प्रल्हाद काळे (८७१७), प्रल्हादराव चापके (८६१०), सोसायटी गटात- राजेंद्र जाधव (५२), अनु.जाती जमाती- चंद्रमुनी मस्के (८८४६), महिला राखीव- कमलाबाई पाटील (८५६३), पद्मीनबाई मुळे (८३०१), इतर मागास प्रवर्ग- संजय लोलगे (८८७५), विमुक्त जाती भटक्या जमाती गट- गंगाधर पिसाळ (८७९७) यांचा समावेश आहे. तर अॅड. जाधव यांच्या पॅनलमधील अॅड.शिवाजी जाधव (८५४५), भगवान धस (८६१०), श्यामराव बेंडे (८५८८), विठ्ठल भोसले (८५८८), दादाराव चापके () यांचा समावेश आहे. पूर्णा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या चुरशीचा मुकाबला पहावयास मिळाला. अत्यंत कमी मताधिक्क्याने उमेदवार विजयी झाले. दोन्ही पॅनल प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात दोघेही यशस्वी ठरले आहेत. स्पष्ट बहुमतासह दांडेगावकरांनी पूर्णा ताब्यात ठेवून सहकार व तालुक्याच्या राजकारणातील दबदबा दाखवून दिला आहे. तर अॅड. जाधव यांनी अत्यंत चिवट झुंज दिली. पॅनलला बहुमत आले नसले तरी त्यांची कामगिरी तालुक्यात आगामी काळात भाजप पॉवरफूल होणार हे दाखवणारी आहे.