कारवाईस गेलेल्या मनपा पथकाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:04 AM2021-05-24T04:04:16+5:302021-05-24T04:04:16+5:30
औरंगाबाद : संचारबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांपासून ...
औरंगाबाद : संचारबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांपासून व्यापारी दुपारी बारा वाजल्यानंतरही व्यवहार करीत असल्याने महापालिका प्रशासनाने शनिवारपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी रविवारी गणेश कॉलनी भागातील रशिदपुरा येथे मनपाचे पथक गेले असता धक्काबुक्की करण्यात आली. मात्र, मनपा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली नसल्याचे समजते.
राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १ जूनपर्यंत कडक निर्बंध जाहीर केले आहेत. काही दिवसांपासून शहरात वर्दळ वाढली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे शनिवारी मनपा प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दहा पथके स्थापन केली. पहिल्या दिवशी या पथकांनी तब्बल शंभर व्यापाऱ्यांवर कारवाई करून २ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. रविवारी सुट्टीच्या दिवशी ही पथकांनी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. झोन क्रमांक ३ अंतर्गत असलेल्या पथकाने गणेश कॉलनी भागातील रशिदपुरा येथे एका व्यापाऱ्याला नियोजित वेळेनंतर व्यवहार करताना पकडले. पथक दंडासाठी सरसावताच परिसरातील काही नागरिक जमा झाले. त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. काही तरुण पथकाच्या अंगावर धावून गेले. अधिकारी - कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी असलेले नागरी मित्र पथकातील सदस्य हे बघत होते. संबंधित व्यापाऱ्याला नंतर दंड आकारण्यात आला. मात्र, पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली नाही.
प्रशासनाने त्वरित विचारणा केली
कारवाईसाठी गेलेल्या पथकावर जमाव चालून आल्याचे कळताच संबंधित अधिकारी शहापूरवाड यांना गुन्हा दाखल करण्याची गरज आहे का, अशी विचारणा करण्यात आली. त्यांनी यासंदर्भात नकार दिला, असे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.